फायनलमध्ये नवे नियम!
#लंडन
जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेचा अंतिम सामना दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ संघांत होणाऱ्या सामन्याद्वारे कसोटीतील जगज्जेत्या संघाचा फैसला होणार आहे. अशा या महत्त्वाच्या सामन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लंडनमधील ओव्हल स्टेडियम या तटस्थ ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलियात बुधवारपासून (दि. ७) अंतिम सामना सुरू होत आहे. टीम इंडियानं काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अशातच जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम लढतीतही कांगारूंना पाणी पाजून टीम इंडिया ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन’ हा किताब पटकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
विशेष म्हणजे, टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघानं २०२१ मध्येही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मात्र, न्यूझीलंडकडून आठ विकेट्सनी पराभव पत्करावा लागल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मागचा पराभव विसरून यंदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गदेवर कब्जा करण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या ब्लॉकबस्टर फायनल मॅचबाबत दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तसेच, हा अंतिम सामना क्रिकेटमधील बदललेल्या नियमांसाठीही चर्चेत आहे. या सामन्यापासूनच क्रिकेटविश्वात करण्यात आलेले अनेक बदल लागू होणार आहेत.
अंतिम सामन्यात 'सॉफ्ट सिग्नल' नियम वापरला जाणार नाही. आयसीसीने यापूर्वीच ही घोषणा केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेल्यानंतर मैदानावरील पंचांना निर्णयाचा संदर्भ देण्यापूर्वी 'सॉफ्ट सिग्नल' देण्याचा अधिकार राहणार नाही. यापूर्वी, मैदानावरील पंचांनी संशयास्पद निर्णयाबाबत तिसऱ्या अम्पायरची मदत घेतल्यास त्याला 'सॉफ्ट सिग्नल' अर्थात त्यांचा अंदाज द्यावा लागत होता. तिसरे पंच ठाम नसल्यास मैदानावरील पंचांचा ‘साॅफ्ट सिग्नल’ हाच अंतिम निर्णय ठरत होता. मात्र, आयसीसीने या नियमाला कायमची तिलांजली देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील 'नो सॉफ्ट सिग्नल' चा नियम १ जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील या सामन्यापासून सुरू होत आहे.
'सॉफ्ट सिग्नल' नियमावरून अनेकदा गदारोळ झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान, मार्नस लॅबुशेनला मैदानावरील अम्पायर्सनी सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट केलं होतं. स्लिपमध्ये पकडलेला हा कॅच क्लीन नव्हता, पण मैदानावरील अम्पायर्सचा निर्णय रद्द करण्यासाठी थर्ड अम्पायरकडे पुरेसे पुरावे नव्हते, त्यामुळे मैदानावरील अम्पायर्सचाच निर्णय कायम ठेवण्यात आला.
आयसीसीनं १ जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान अटीतटीच्या लढतीत हेल्मेट घालणं बंधनकारक केलं आहे. आता वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाला हेल्मेट घालावं लागणार आहे. जेव्हा यष्टीरक्षक स्टंपजवळ उभा राहतो आणि क्षेत्ररक्षकही फलंदाजाच्या अगदी जवळ येऊन उभे राहतात, तेव्हा फलंदाजांना हेल्मेट घालणं अनिर्वाय असणार आहे.
जगज्जेतेपदाचा निर्णय फ्लड लाईट्समध्ये ?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या फायनलमध्ये ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे साहजिकच नैसर्गिक प्रकाश पुरेसा चांगला नसेल. त्यामुळे फ्लडलाइट्स चालू करण्यात येईल. हे लक्षात घेऊन दोन्ही संघांना आपल्या डावपेचांमध्ये बदल करावा लागणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता या सामन्यासाठी १२ जून हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
फ्री हिटच्या नियमातही बदल
आयसीसीनं एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतील फ्री हिट्सच्या नियमांमध्येही किरकोळ बदल केले आहेत. आता फ्री हिटच्या वेळी जर बॉल स्टंपला लागला आणि फलंदाजानं त्यावर धावा काढल्या, तर त्या धावादेखील स्कोअरमध्ये जोडल्या जातील. म्हणजेच, फ्री हिट दिल्यावर जर फलंदाज स्टंप आऊट झाला आणि तरीदेखील त्यानं धावा काढल्या असतील, तर त्या स्कोअरमध्ये मोजल्या जातील.
वृत्तसंस्था