विजयानंतरही मुंबईची धाकधूक

कॅमेरून ग्रीनने झळकावलेल्या नाबाद शतकामुळे मुंबई इंडियन्सने रविवारी (दि. २१) आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात हैदराबाद सनरायझर्सचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. मात्र, या विजयानंतरही प्लेऑफमधील मुंबईचा प्रवेश निश्चित नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 22 May 2023
  • 03:09 pm
विजयानंतरही मुंबईची धाकधूक

विजयानंतरही मुंबईची धाकधूक

ग्रीनच्या शतकामुळे हैदराबादचा ८ गडी राखून धुव्वा, गुजरातने बंगलोरला हरवले तरच मुंबई प्लेऑफमध्ये

#मुंबई

कॅमेरून ग्रीनने झळकावलेल्या नाबाद शतकामुळे मुंबई इंडियन्सने रविवारी (दि. २१) आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात हैदराबाद सनरायझर्सचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. मात्र, या विजयानंतरही प्लेऑफमधील मुंबईचा प्रवेश निश्चित नाही.

प्रथम फलंदाजी करताना मयंक अग्रवाल (८३) आणि विव्रांत शर्मा (६९) यांच्या शांनदार अर्धशतकांमुळे हैदराबादने ५ बाद २०० अशी भक्कम धावसंख्या उभारली. मात्र, मुंबईच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करीत १२ चेंडू राखून बाजी मारली आणि आपल्या संघाच्या प्लेऑफच्या आशा कायम राखल्या. ग्रीनने ४७ चेंडूंत ८ षटकार आणि ८ चौकारांसह नाबाद १०० धावा करीत मुंबईच्या विजयात निर्णायक योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माने ३७ चेंडूंत १ षटकार आणि ८ चौकारांसह ५६ धावा करीत त्याला चांगली साथ दिली. या विजयासह मुंबईने १६ गुणांची कमाई करीत सध्या गुणतालिकेत चौथे स्थान प्राप्त केले आहे.

स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने राॅयल चॅलेंजर्स बंगलोरला नमवले तरच मुंबईला अंतिम चार संघांत स्थान मिळवता येईल. बंगलोर विजयी ठरले तर हा संघ १६ गुण मिळवूनही मुंबईपेक्षा सरस धावगतीच्या जोरावर प्लेऑफसाठी पात्र ठरेल. असे झाल्यास मुंबईला स्पर्धेबाहेर व्हावे लागेल.

वानखेडे स्टेडियम या घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून मुंबईने हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. विव्रांत शर्मा-मयंक अग्रवाल यांनी १३.५ षटकांत १४० धावांची सलामी देत मुंबईच्या सर्मथकांच्या पोटात गोळा आणला होता. मयंकने ४६ चेंडूंत ४ षटकार आणि ८ चौकारांसह ८३ तर विव्रांतने ४७ चेंडूंत २ षटकार आणि ९ चौकारासंह ६९ धावा केल्या. मात्र या दोघांचा अपवाद वगळता हैदराबादच्या इतर फलंदाजांना अपेक्षित वेगाने फलंदाजी करता आली नाही. यामुळे या संघाला संधी असूनही सव्वादोनशेच्या घरात मजल मारता आली नाही. अखेरच्या षटकांत ऐडन मार्करमने ७ चेंडूंत नाबाद १३ धावा केल्याने हैदराबादला दोनशे धावा पूर्ण करता आल्या. मुंबईतर्फे आकाश मधवालने प्रभावी मारा करताना ३७ धावांत ४ बळी घेतले.

विजयासाठी २०१ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला इशान किशनच्या (१४) रूपात पहिला धक्का लवकर बसला. मात्र त्यानंतर रोहित आणि कॅमेरून यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०.२ षटकांत १२८ धावांची वेगवान भागिदारी करीत मुंबईला विजयाच्या मार्गावर आणले. रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या (१६ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २५) साथीने कॅमेरूनने आपल्या संघाला सामना जिंकून दिला. या दोघांनी ४.५ षटकांत नाबाद ५३ धावा जोडल्या. या मोसमातील आपले पहिले शतक झळकावणारा ग्रीन सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक :

सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ५ बाद २०० (मयंक अग्रवाल ८३, विव्रांत शर्मा ६९, हेन्रिक क्लासेन १८, आकाश मधवाल ४/३७, ख्रिस जाॅर्डन १/४२) पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स : १८ षटकांत २ बाद २०१ (कॅमेरून ग्रीन नाबाद १००, रोहित शर्मा ५६, सूर्यकुमार यादव नाबाद २५, इशान किशन १४, भुवनेश्वरकुमार १/२६, मयंक डागर १/३७).

सामनावीर : कॅमेरून ग्रीन

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story