IPL 2025 (MI vs SRH, Match 33) Highlights |
IPL 2025 (MI vs SRH, Match 33) Highlights | आयपीएल २०२५ च्या ३३ व्या सामन्यात गोलंदाजांनंतर फलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत पाच गडी गमावून १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईने १८.१ षटकांत सहा गडी गमावून १६६ धावा करून सामना जिंकला. मुंबईसाठी कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही, परंतु संघातील सर्वच खेळाडूंनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आणि संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. मुंबईचा हा सात सामन्यांतील तिसरा विजय आहे आणि संघ सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्याच वेळी, दुसरीकडे सनरायझर्सना सात सामन्यांमधील चौथा पराभव पत्करावा लागला आहे आणि ते चार गुणांसह नवव्या स्थानावर आहेत.
विल जॅक्स ठरला सामनावीर...
मुंबईच्या विजयात विल जॅक्सनं अष्टपैलू कामगिरी केली आणि संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. जॅक्सनं प्रथम गोलंदाजीत 4 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले. त्यानंतर फलंदाजीत २६ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३६ धावा केल्या.
𝐖𝐢𝐥𝐥 for the 𝐖𝐢𝐧 💪
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
A complete all-round performance from Will Jacks earns him a well deserved Player of the Match award 🫡
Scorecard ▶ https://t.co/8baZ67Y5A2#TATAIPL | #MIvSRH | @mipaltan pic.twitter.com/s10ej494Rv
मुंबईचा डाव...
लक्ष्याचा पाठलाग करताना, प्रभावी खेळाडू म्हणून आलेल्या रोहित शर्माने रायन रिक्लटनसह संघाला चांगली सुरुवात करून दिली परंतु पुन्हा एकदा तो त्याच्या डावाचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला आणि त्यानंतर तो २६ (१६) धावांवर बाद झाला. त्यानंतर रिक्लटनला जीवदान मिळूनही तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि ३१ (२३) धावांवर तबूंत परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव २६ (१५) आणि त्याच्यापाठोपाठ लगेचच २६ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३६ धावा काढून विल जॅक्सही माघारी परतला.
पुढे तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी काही चांगले फटके मारत संघाला विजयाच्या जवळ नेले. १८ व्या षटकाच्या सुरुवातीला, मुंबईला जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता होती आणि तिलकने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली, परंतु पुढच्या चेंडूवर हार्दिक बाद झाला. हार्दिकने २१(०९)धावा केल्या. त्यापाठोपाठ नवीन फलंदाज म्हणून आलेला नमन धीरही पाचव्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला आणि मुंबईच्या विजयाची प्रतीक्षा वाढली. पुढे १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तिलकने चौकार मारून मुंबईला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा १७ चेंडूत दोन चौकारांसह २१ धावा काढून नाबाद राहिला. सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजीत कर्णधार पॅट कमिन्सने शानदार गोलंदाजी केली आणि तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय इशान मलिंगाने दोन आणि हर्षल पटेलने एक विकेट घेतली.
हैदराबादचा डाव...
तत्पूर्वी, या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादची फलंदाजी खूपच संथ राहिली, पण अनिकेत वर्माने शेवटचे म्हणजेच २० वे षटक घेऊन आलेल्या हार्दिक पंड्याची धुलाई करत २२ धावा घेतल्या, ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत पाच गडी गमावून १६२ धावा करता आल्या. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने २८ चेंडूत सात चौकारांसह ४० धावांची सर्वाधिक धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना अभिषेक आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेपर्यंत मुंबईला कोणतेही यश मिळू दिले नाही आणि पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने अभिषेकला बाद करून हैदराबादला पहिला धक्का दिला. यानंतर हैदराबादचा डाव डळमळीत झाला. या सामन्यातही इशान किशनला चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो दोन धावा करून बाद झाला. ट्रॅव्हिस हेडला जीवनदान मिळालं पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही आणि २९ चेंडूत तीन चौकारांसह २८ धावा काढल्यानंतर तो बाद झाला.
पुढे नितीश कुमार रेड्डीही १९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. नंतर, हेनरिक क्लासेनने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या १३० च्या पुढे नेली, परंतु बुमराहने त्याला त्रिफळाचित केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले. क्लासेनने २८ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. त्यानंतर अनिकेत वर्माने शानदार कामगिरी केली ज्यामुळे संघाची धावसंख्या १६० पुढे पोहचण्यास मदत झाली. अनिकेत आठ चेंडूत दोन षटकारांसह १८ धावा काढून तर कर्णधार पॅट कमिन्स चार चेंडूत एका षटकारासह आठ धावा काढून नाबाद राहिला. मुंबईकडून गोलंदाजीत विल जॅक्सने दोन, तर ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.