मराठमोळे अजिंक्य-शार्दुल झुंजले, पण...

भारताच्या अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या मराठमोळ्या मावळ्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि फिरकी माऱ्याला तोंड देत पराक्रम गाजवला. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघाला मोठी आघाडी घेण्यापासून ते रोखू शकले नाहीत. भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरल्याने ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 10 Jun 2023
  • 07:57 am
मराठमोळे अजिंक्य-शार्दुल झुंजले, पण...

मराठमोळे अजिंक्य-शार्दुल झुंजले, पण...

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची भारतावर १७३ धावांची मोठी आघाडी, दुसऱ्या डावात १ बाद २३

#लंडन

भारताच्या अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या मराठमोळ्या मावळ्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि फिरकी माऱ्याला तोंड देत पराक्रम गाजवला. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघाला मोठी आघाडी घेण्यापासून ते रोखू शकले नाहीत. भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरल्याने ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांच्या उत्तरात भारताचा पहिला डाव ६९.४ षटकांत २९६ धावांवर आटोपला. ३४ वर्षीय अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे शतक ११ धावांनी हुकले. त्याने १२९ चेंडूंत १ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या. त्याला मोलाची साथ देणाऱ्या अष्टपैलू शार्दुलने संयमी फलंदाजी करताना १०९ चेंडूंत ६ चौकारांनिशी ५१ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त रवींद्र जडेजाचा (४८) अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी कांगारूंच्या वेगवान माऱ्यासमोर नांगी टाकली. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्राला चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १ बाद २३ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी  १९७ धावांवर पोहोचली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात रंगत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडच्या शानदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचला. परंतु, या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच आघाडीचे फलंदाज गमावून केवळ १५१ धावा केल्या होत्या.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने अप्रतिम फलंदाजी करून भारताची शान राखली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १०९ धावांची भागिदारी केल्यामुळे भारताला फाॅलोऑन टाळता आला.  दोघांनाही ऑस्ट्रेलियाकडून एक-एक जीवदान मिळाले. त्याचा त्यांनी योग्य वापर केला. अजिंक्य रहाणेला पॅट कमिन्सने कॅमेरून ग्रीनकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार पॅट कमिन्सने ८३ धावांत सर्वाधिक ३ गडी बाद केले. मिचेल स्टार्क, स्काॅट बोलॅंड आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.  

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर भारताने टी ब्रेकआधी पहिल्या १० षटकात ३७ धावा फलकावर लावल्या. मात्र, कर्णधार रोहित शर्मा (१५) आणि शुबमन गिल (१३) धावांवर बाद झाला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला बाद केलं, तर गिल स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. भारताच्या पहिल्या इनिंगच्या १९ व्या षटकात मिचेल स्टार्कने अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. चेंडूने उसळी घेतल्यानं विराट कोहलीने त्या चेंडूवर सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू बॅटला लागून दुसऱ्या स्लिपच्या दिशेनं गेला आणि विराट झेलबाद झाला.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाचा प्रारंभ होताच मोहम्मद सिराजने डेव्हीड वाॅर्नरला बाद केले. पहिल्या डावात ४३ धावा करणाऱ्या वाॅर्नरला यावेळी जेमतेम एक धाव करता आली. त्यानंतर उस्मान ख्वाजा (१३) आणि मार्नस लाबुशेन (१२) हे भारतीय गोलंदाजांचा सामना करीत होते. 

संिक्षप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ४६९.

भारत : पहिला डाव : ६९.४ षटकांत सर्व बाद २९६ (अजिंक्य रहाणे ८९, शार्दुल ठाकूर ५१, रवींद्र जडेजा ४८, रोहित शर्मा १५, चेतेश्वर पुजारा १४, विराट कोहली १४, शुभमन गिल १३, मोहम्मद शमी १३, श्रीकर भरत ५, उमेश यादव ५, मोहम्मद सिराज नाबाद ०, पॅट कमिन्स ३/८३, कॅमेरून ग्रीन २/४४, स्काॅट बोलॅंड २/५९, मिचेल स्टार्क २/७१, नाथन 

लाॅयन १/१९).

ऑस्ट्रेलिया: दुसरा डाव : १२ षटकात १ बाद २४ (उस्मान ख्वाजा खेळत आहे १३, मार्नस लाबुशेन खेळत आहे ८, मोहम्मद 

सिराज १/१४).

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story