#न्यूयाॅर्क | अमेरिकन टी-२० लीग मेजर लीग क्रिकेटमध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानची टीम लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने या हंगामातील सर्वात कमी धावसंख्या नोंदवली. रविवारी (दि. १५) शाहरुख खानच्या संघाला टेक्सास सुपर किंग्जविरूध्द ५७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
नाणेफेक जिंकल्यानंतर लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टेक्सास सुपर किंग्जने ४ गडी गमावून १८१ धावा केल्या. टेक्सास सुपर किंग्ज हा चेन्नई सुपर किंग्जचा पालक संघ आहे. १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लॉस एंजेलिस नाईट रायडर्स १७.१ षटकात फक्त १२४ धावाच करू शकले.
चार विकेट घेणाऱ्या नूर अहमदला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. नूरने नाईट रायडर्सचा सुपरस्टार आंद्रे रसेल आणि कर्णधार सुनील नरेन यांना एकाच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रसेल एक धाव काढून बाद झाला आणि नरेनला खातेही उघडता आले नाही. टेक्सास सुपर किंग्जने डॅरिल मिशेलने ३३ चेंडूत ३६ धावा, डेव्हॉन कॉनवेने २२ चेंडूत ३४ धावा, डोनोव्हन फरेरा यांनी १६ चेंडूत ३२ धावा आणि शुभम रांजणे याने २४ धावा केल्या. नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेल आणि शॅडली व्हॅन शाल्कविक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
१८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाईट रायडर्सचा संघ १२४ धावांवरच बाद झाला. मेजर लीग क्रिकेटच्या चालू हंगामात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. टेक्सासविरुद्ध लॉस एंजेलिस नाईट रायडर्सची फलंदाजी अपयशी ठरली. एका क्षणी त्यांनी ८९ धावांत आठ विकेट गमावल्या. नवव्या क्रमांकाचा फलंदाज शॅडली वॉनने २७ धावा करीत आपल्या संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला. या संघातर्फे अॅलेक्स हेल्सने २५, मॅथ्यू ट्रम्पने २३ आणि उन्मुक्त चंदने २२ धावा केल्या. या स्पर्धेत लॉस एंजेलिसचा हा दुसरा पराभव आहे. ते पॉइंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. टेक्सास सुपर किंग्ज दोन विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेत सहा संघ खेळत आहेत.