संग्रहित छायाचित्र....
Team India | भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने एका वृत्त संस्थेला सांगितले की, बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. याशिवाय, या खेळाडूच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यावरही साशंकता आहे. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
सूत्राने केला मोठा खुलासा...
बीसीसीआयच्या एका सूत्राने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून बरा होईल, हे कठीण वाटत आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत तो एकही सामना खेळणार नाही. बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान मिळू शकते. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यासाठी बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण समोर आलेल्या माहितीनुसार, आता तो शेवटच्या सामन्यात खेळेल ही शक्यताही कमी आहे. तथापि, अद्यापपर्यंत बीसीसीआयकडून बुमराहच्या दुखापतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
बुमराह सोमवारी त्याच्या पाठीच्या दुखापतीची तपासणी करण्यासाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला. तो २-३ दिवस वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली राहील. जर बुमराह तंदुरुस्त झाला तर तो संघात राहील. पण जर तो अनफिट असेल तर हर्षित राणाला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ बदलण्यासाठी ११ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे अजूनही सुमारे एक आठवडा शिल्लक आहे. या काळात भारत आपल्या संघात बदल करू शकतो.
बुमराह आहे जबरदस्त फॉर्ममध्ये....
जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलिकडेच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. या मालिकेत बुमराहने सलग ५ सामने खेळले. वर्कलोड वाढल्यामुळे बुमराहला दुखापत झाल्याचे मानले जात आहे. या मालिकेत त्याने १५१.२ षटके टाकली, जी एक मोठी आकडेवारी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ...
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर , हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा.