ISSF World Cup 2025
नवी दिल्ली : बर्लिन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता या भारतीय जोडीने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. आर्या-अर्जुन जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत चीनच्या झिफेई वांग आणि लिहाओ शेंग यांना १७-७ असे हरवून सुवर्णपदक जिंकले. नॉर्वेच्या जीनेट हेग ड्युस्टॅड आणि जॉन-हर्मन हेग यांनी अमेरिकेच्या सेगेन मॅडलेना आणि पीटर मॅथ्यू फिओरी यांना १६-१४ असे हरवून कांस्यपदक जिंकले.
पात्रता फेरीत आर्या-अर्जुन जोडीने ६३५.२ गुणांसह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अर्जुनने पात्रता फेरीत ३१७.७ गुण मिळवले तर आर्याने ३१७.५ गुण मिळवले. दुसरी भारतीय जोडी, एलावेनिल वॅलारिवन आणि अंकुश जाधव यांनी ६३१.८ गुणांसह पात्रता फेरीत सहावे स्थान मिळवले. या वर्षाच्या सुरुवातीला, आर्याने पेरूमधील लिमा येथे झालेल्या विश्वचषकात रुद्राक्ष पाटील सोबत १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.
भारत पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर
बर्लिनमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात भारत चार पदकांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. भारतासाठी आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता या जोडीने १० मीटर रायफल मिश्र स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर सुरुचीने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर स्विफ्ट कौर समरा आणि एलावेनिल वलारिवन यांनी आपापल्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
भारत आता चीन (सहा) आणि नॉर्वे (चार) यांच्या मागे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चीनने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकून गुण तालिकेत अव्वल तर नॉर्वेने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे.