ISSF World Cup 2025 : भारताला मिळाली नवीन शूटिंग क्वीन...! १८ वर्षीय सुरुचीने मनू भाकरला हरवून जिंकले सुवर्णपदक...

भारताची नवी शूटिंग क्वीन सुरुची ही मनु भाकरच्या शहरातील आहे. ती मूळची हरियाणातील झज्जरची आहे. विशेष म्हणजे तिने त्याच ठिकाणाहून प्रशिक्षण घेतले आहे जिथे मनू नेमबाजी शिकली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Thu, 17 Apr 2025
  • 03:49 pm
Sport news, Shooting  news,

Inder Singh Suruchi beating Manu Bhaker to gold

ISSF Shooting World Cup 2025 : भारतीय नेमबाज सुरुची सिंगने कमाल केली आहे. तिने आयएसएसएफ विश्वचषकात १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, सुरुची ही स्टार नेमबाज मनू भाकरची शेजारी आहे. ती देखील मनूच्या शहरातून आहे. सुरुचीने अंतिम सामन्यात मनू भाकरचा पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. तिने अंतिम सामन्यात २४३.६ गुण मिळवले.

आयएसएसएफ विश्वचषक २०२५ चे पेरूमधील लिमा येथे आयोजन करण्यात आले आहे. सुरुचीने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. तिने अलीकडेच अर्जेंटिनामधील ब्यूनस आयर्स येथे झालेल्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हा सुरुचीचा अंतिम स्कोअर २४४.६ होता. आता तिने लिमामध्ये मनू भाकरचा १.३ गुणांनी पराभव करत विजय मिळवला आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर चीनच्या याओ कियानक्सुनने कांस्यपदक जिंकले. त्याआधी पात्रता फेरीत, सुरुचीने ५८२ गुणांसह दुसरे स्थान तर मनू भाकरने ५७८ गुणांसह चौथे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आणखी एक भारतीय नेमबाज संयम ५७१ गुणांसह ११ व्या स्थानावर राहिली होती.

मनूच्या शहरातून भारताला मिळाली नवीन शूटिंग क्वीन ...

भारताची नवी शूटिंग क्वीन सुरुची ही मनु भाकरच्या शहरातील आहे. ती मूळची हरियाणातील झज्जरची आहे. विशेष म्हणजे तिने त्याच ठिकाणाहून प्रशिक्षण घेतले आहे जिथे मनू नेमबाजी शिकली आहे. सुरुचीला गुरु द्रोणाचार्य शूटिंग अकादमीमध्ये प्रशिक्षक सुरेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सुरुचीने जिंकली आहेत अनेक पदके

सुरुचीने ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिने डेहराडून येथे आयोजित २०२५ च्या राष्ट्रीय खेळांमध्येही सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी सुरुचीने अंतिम फेरीत २४५.७ गुण मिळवले होते.

Share this story

Latest