IPL 2026 (SRH vs LSG) : अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अवघ्या नऊ धावांत अभिषेक शर्मा अणि ट्रॅव्हिस हेड या वादळी फलंदजांच्या विकेट घेतल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने झळकावलेल्या नाबाद ६८ धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने रविवारी (दि. ५) सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभूत केला. लखनौचा या मोसमातील हा पहिलाच विजय तर हैदराबादचा दुसरा पराभव ठरला.
Yeh toh bas shuruaat hai 👊 pic.twitter.com/jUoncIoWkl
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 5, 2026
लखनौने नाणेफेक जिंकून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या संघाला वादळी सुरुवात करून देण्यासाठी प;िद्ध असलेली अभिषेक शर्मा अणि ट्रॅव्हिस हेड ही सलामी जोडी घरच्या मैदानावर धावांची बरसात करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र शमीने या दोघांनाही तीन षटकांच्या आत तंबूत धाडून हैदराबादच्या उरात धडकी भरवली. हेन्रिक क्लासेन आणि नितीशकुमार रेड्डी यांच्या अर्धशतकामुळे हैदराबादने २० षटकांत ९ बाद १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, लखनौने १९.५ षटकांत ५ बाद १६० धावा करीत सामना जिंकला. शमी सामनावीर ठरला.
शमीच्या अफलातून कामगिरीनंतर लखनौच्या विजयात कर्णधार ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ५० चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. एडेन मार्करमनेही २७ चेंडूंमध्ये ४५ धावांचे योगदान दिले. त्याने २ षटकार आणि ६ चौकार मारले. हैदराबादकडून हर्ष दुबेने दोन बळी घेतले, तर इशान मलिंगा आणि शिवांग कुमार यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, हेन्रिक क्लासेन (६२ धावा, ४१ चेंडू, २ षटकार, ५ चौकार) आणि नितीश कुमार रेड्डी (५६ धावा, ३३ चेंडू, ५ षअकार, ३ चौकार) यांनी अर्धशतके झळकावली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. लखनौकडून मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.


