– हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी ठरला सामनावीर,
– फलंदाजीत २४ चेंडूत ३९ धावा तर गोलंदाजीत ४ षटकात १७ धावा देत घेतले दोन बळी
IPL 2026 (KKR vs SRH Highlights) : इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामातील सहावा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत ६५ धावांनी विजय मिळवला आणि या हंगामातील आपल्या विजयाचे खाते उघडले.
गुरुवारी (दि.३) ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत आठ गडी गमावून २२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, कोलकाता संघ १६ षटकांत केवळ १६१ धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला.
विजयासाठी २२७ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ३० धावसंख्येवर फिन ॲलनच्या रूपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्यात ३७ धावांची छोटी भागीदारी झाली. रहाणे ८ धावा करून बाद झाला. रघुवंशीने सर्वाधिक ५२ धावा करून केकेआरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
या सामन्यात रिंकू सिंगकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तोही महत्त्वाच्या वेळी ३५ धावा करून बाद झाला. रघुवंशी आणि रिंकू सिंग या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही आणि केकेआरचा डाव १६ षटकांत १६१ धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सनरायझर्स हैदराबादकडून जयदेव उनाडकटने तीन बळी घेतले, तर इशान मलिंगा आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हर्ष दुबेनेही एक बळी घेतला.
तत्पूर्वी, या सामन्यात हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने अर्धशतकी खेळी केली, तर अभिषेक आणि ट्रॅलिस हेड यांना अर्धशतक झळकावता आले नाही, पण त्यांची खेळी संघासाठी खूप उपयुक्त ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या हंगामातील पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेड (४६) आणि अभिषेक शर्मा (४८) यांनी या सामन्यात संघाला भक्कम सुरुवात करून दिली आणि अवघ्या ३४ चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी ८२ धावा जोडल्या. पहिल्या सामन्यात हेडने ११ आणि अभिषेकने सात धावा केल्या होत्या. त्यांनी अवघ्या ४.१ षटकांत संघाच्या पहिल्या ५० धावा पूर्ण केल्या. कार्तिक त्यागीने आपल्या पहिल्याच षटकात हेडला कॅमेरॉन ग्रीनकरवी झेलबाद करून ही भागीदारी तोडली.
हेडच्या २१ चेंडूंतील शानदार खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. अभिषेकनेही तितक्याच म्हणजे २१ चेंडूंतील आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. त्यानंतर क्लासेनने सूत्रे हाती घेतली आणि चार चौकार व एका षटकारासह ३५ चेंडूंमध्ये चार चौकार आणि १ षटकारासह ५२ धावा केल्या. दरम्यान, या सामन्यात ईशान किशन पुनरागमन करण्यात अपयशी ठरला आणि ९ चेंडूंत १४ धावा करून बाद झाला. अनिकेत वर्मा एका धावेवर बाद झाला. नितीश कुमार रेड्डीने ३९ धावा केल्या, तर सलील अरोरा शून्यावर बाद झाला. केकेआरकडून ब्लेसिंग मुझारबानीने सर्वाधिक चार बळी घेतले, तर वैभव अरोराने दोन, आणि कार्तिक त्यागी व अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
IPL 2026 (LSG vs DC) : दिल्लीचा लखनौवर ६ गडी राखून विजय; रिझवी आणि स्टब्सची शतकी भागीदारी…
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा चौथा विजय…
२०१२ नंतर प्रथमच केकेआरने सलग दोन सलामीचे सामने गमावले आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी, त्यांना हंगामाच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, २०२० पासून कोलकाताविरुद्धच्या १४ सामन्यांमधील सनरायझर्सचा हा केवळ चौथा विजय आहे. तसेच, ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या १२ आयपीएल सामन्यांमधील हैदराबादचा हा चौथा विजय आहे.


