Advertisement

IPL 2026 (RCB vs CSK) | चेन्नईच्या पराभवाची हॅट्ट्रिक; हाय स्कोअरिंग सामन्यात आरसीबीने ४३ धावांनी उडवला धुव्वा….

बंगळुरू : चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या हाय स्कोअरिंग सामन्यात यजमान संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्यावर ४३ धावांच्या फरकाने सरशी साधली. रविवारी (दि. ५) रात्री उशिरा झालेल्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ३ बाद २५० धावांचा डोंगर उभारला. टीम डेव्हिडने वादळी अर्धशतक झळकावताना २५ चेंडूंत नाबाद ७० धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने ८ षटकार आणि ३ चौकारांची आतषबाजी केली. देवदत्त पडिक्कल (५०), कर्णधार रजत पाटीदार (नाबाद ४८), फिल साॅल्ट (४६) आणि विराट कोहली (२८) यांनीही उपयोगी योगदान दिल्याने या संघाने अडीचशेपार मजल मारली. प्रत्युत्तरात, चेन्नईचा डाव १९.४ षटकांत २०७ धावांवर संपला. बंगळुरूतर्फे भुवनेश्वरकुमारने तीन तर अभिनंदन सिंग, जेकब डफी आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण ४५७ धावा फटकावल्या गेल्या.

चेन्नईकडून सर्फराझ खानने सर्वाधिक ५० (२५ चेंडूंत २ षटकार, ८ चौकार) धावांचे योगदान दिले. प्रशांत वीरने ४३ (२९ चेंडूंत १ षटकार, ६ चौकार) आणि जेमी ओव्हरटनने ३७ धावा (१६ चेंडूंत २ षटकार, ४ चौकार) करीत विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, आव्हान मोठे असल्याने त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

तत्पूर्वी, विराट-साॅल्ट जोडीने बंगळुरूला २७ चेंडूंत ३७ धावांची सावध सलामी दिली. विराट २८ धावा करून (१८ चेंडूंत १ षटकार, २ चौकार) बाद झाला. यानंतर साॅल्ट-पडिक्कल जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागिदारी करीत आरसीबीला शतकासमीप नेले. शिवम दुबेने साॅल्टला बाद करून ही जोडी फोडली. त्याने ३० चेंडूंत २ षटकार आणि ३ चौकारांसह ४६ धावा केल्या. पडिक्कल-पाटीदार जोडीने तिसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ५८ धावा जोडत धावगती वाढवली. मात्र, खरा धमाका त्यानंतर झाला.

अखेरच्या पाच षटकांत ९७ धावांची बरसात

१५ षटकांचा खेळ संपल्यावर बंगळुरूने ३ बाद १५३ धावा केल्या होत्या. त्यावेळीची धावगती बघता हा संघ २१० ते सव्वादोनशेच्या घरात मजल मारेल, असे वाटत होते. मात्र, टीम डेव्हिड आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्या मनात काही वेगळेच होते. १६व्या षटकापासून या जोडीने टाॅप गिअर टाकला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी सुरू केली. खलील अहमदने टाकलेल्या १६व्या षटकात १९ धावा निघाल्या. यात पाटीदारने २ षटकार आणि एक चौकार वसूल केला. यावेळी पाटीदार १४ चेंडूंत ४० तर टीम डेव्हिड ५ चेंडूंत दोन धावांवर खेळत होते. १७व्या षटकात टीम डेव्हिड नूर अहमदवर बरसला. त्याने ३ षटकार मारून संघाच्या धावसंख्येत २१ धावांची भर घातली. अंशुल कंबोजने टाकलेल्या १८व्या षटकात १४ धावा निघाल्या. यात डेव्हिडने एक षटकार आणि चौकार मारला.

१९व्या षटकात तर डेव्हिडच्या आक्रमकतेने टोक गाठले. जॅमी ओव्हरटनने टाकलेल्या या षटकात त्याने ४ षटकार आणि दोन चौकारांसह ३० धावा वसूल करीत आपले अर्धशतक पूर्ण केले. यापैकी अखेरच्या चेंडूवरील षटकार तर स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला. कंबोजने टाकलेल्या अखेरच्या षटकात १३ धावा निघाल्या. या अखेरच्या पाच षटकांत ११ षटकार आणि ४ चौकारांची उधळण झाली.

होम ग्राउंडवर आरसीबीची या मोसमातील सर्वाधिक धावसंख्या

होम ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या आघाडीच्सा फलंदाजांनी भलत्याच जोशात फटकेबाजी केली. पहिल्या पाचही फलंदाजांनी दीडशेपेक्षज्ञ जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. यामुळे आरसीबीने अडीचशे ही या हंगामातील आपली सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. मात्र, ही या संघाची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या नाही.
२०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध केलेली ५ बाद २६३ ही आरसीबीची सर्वेात्तम धावसंख्या आहे. त्यापासून ही संघ १३ धावांनी मागे राहिला.

भुवीच्या आयपीएलमध्ये २०० विकेट

भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये २०० विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनला. त्यसने आयुष म्हात्रेला (१) बाद करून हा टप्पा गाठला. त्याच्या आधी फिरकीपटू युझवेंद्र चहलने ही कामगिरी केली आहे. भुवनेश्वरने १९२ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. १९ धावांत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. चहलने आतापर्यंत १७६ सामन्यांत सर्वाधिक २२४ विकेट घेतल्या आहेत. सुनील नरेनला दोनशे बळींच्या टप्पा गाठण्यासाठी सात विकेटची गरज आहे.

चेन्नईविरुद्ध विराट किंग

विराट कोहलीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या आता १,१७४ धावा झाल्या आहेत. तो आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही बनला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा रोहित शर्मा आहे. त्याने कोलकाताविरुद्ध १,१६१ धावा केल्या आहेत.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune | कोरेगाव पार्कमधील उड्डाणपुलाच्या कामात विलंब; दोन आयुक्त आमनेसामने, कामाच्या प्रगतीबाबत दोघांच्या दाव्यात तफावत...

Next Post

फिल्टर पाड्याच्या बच्चनची लग्नगाठ...