कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना सोमवारी (दि. ६) पावसामुळे रद्द झाला. चालू हंगामातील पावसामुळे रद्द झालेला हा पहिलाच सामना होता. सोमवार संध्याकाळपासून कोलकातामध्ये अधूनमधून पाऊस पडत होता.
कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावणेसातच्या सुमारास पाऊस सुरू झाला तेव्हा कोलकात्याने ३.४ षटकांत२ बाद २५ धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणे ८ धावांवर आणि अंगक्रिश रघुवंशी ७ धावांवर नाबाद परतले. दुसऱ्या षटकात झेवियर बार्टलेटने कॅमेरॉन ग्रीन (४ धावा) आणि फिन ॲलन (६ धावा) यांना बाद केले.
पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिल्याने पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. या एका गुणाच्या जोरावर पंजाब संघ पाच गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. कोलकाता संघ आठव्या क्रमांकावर आहे.


