लखनौ : प्रत्येक सीझनमध्ये चांगली कामगिरी शक्य नाही. त्यात चढउतार होऊ शकतो. मी मशीन नाही, माणूस आहे, अशा शब्दांत खनौ सुनर जायन्ट्सचा खेळाउू मोहम्मद शमीने आपल्यावरील टीकेला उत्तर दिले आहे.
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज शमी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायन्ट्सचे प्रतिनिधीत्व करत आहे. मागील हंगामात तो नऊ सामन्यांत केवळ सहा विकेट घेऊ शकला होता. तेव्हा त्याच्यावर टीका करण्यात आली होती. यावेळी मात्र त्याने दोन सामन्यांत तीन विकेट घेतल्याआहेत. यात हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केलेल्या मॅच विनिंग कामगिरीचा समावेश आहे. आपल्यावरील टीकेबाबत बोलताना शमी म्हणाला, ‘‘मागील आयपीएल हंगाम खूप आव्हानात्मक होता. मी मशीन नाही, माणूस आहे. कामगिरीत चढउतार होऊ शकतो. मी गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. लोकांच्या ते लक्षात आले नसेल, तर ती वेगळी गोष्ट आहे, पण मी नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.’’
खेळपट्टीच्या स्वभावानुसार गोलंदाजीत बदल करणे महत्त्वाचे होते, असे शमीने सांगितले. त्याने सनरायझर्स हैदराबादचे धोकादायक फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांना लवकर बाद करून विरोधी संघावर दबाव आणला. ‘‘संथ खेळपट्टीवर चेंडूचा वेग कमी ठेवणे आणि अचूक टप्पा व दिशा राखणे महत्त्वाचे आहे. आम्हाला माहित होते की, जर आम्ही अभिषेकला त्याला संधी, तर तो सहजपणे मोठे फटके खेळेल. त्यामुळे आम्ही वेग कमी केला आणि त्याला जास्त उंच फटका मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. हेडबाबतही असेच केले. कौशल्य आणि अनुभवाशिवाय काहीही साध्य होत नाही,” असेही शमीने नमूद केले.
यशाचे श्रेय फिटनेस आणि देशांतर्गत क्रिकेटला
मागील आयपीएल हंगाम शमीसाठी खूप आव्हानात्मक होता. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना, त्याने नऊ सामन्यांमध्ये केवळ सहा बळी घेतले . त्याचा इकॉनॉमी रेट ११.२३ असा जास्त होता. मात्र, यावेळी त्याने जोरदार पुनरागमन केले आहे आणि आपली योग्यता सिद्ध केली आहे.
शमीने आपल्या यशाचे श्रेय फिटनेस आणि देशांतर्गत क्रिकेटला दिले. तो म्हणाला, ‘‘मॅच-फिट राहण्यासाठी सातत्यपूर्ण खेळ आवश्यक आहे. तुम्हाला सातत्याने खेळायचे असेल, तर खेळाच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. केवळ फिट राहूनच तुम्ही तुमच्या कौशल्यावर काम करू शकाल, म्हणूनच मी देशांतर्गत क्रिकेट खेळलो. त्याचा मोठा फायदा मला झाला.’’
शमीची मॅच विनिंग कामगिरी
शमीने रविवारी (दि. ५) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात शमीने अचूक गोलंदाजी करत केवळ नऊ धावा देत ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या धोकादायक फलंदाजांचे बळी घेतले.
शमीने आपल्या गोलंदाजीच्या स्पेलमध्ये २४ पैकी तब्बल १८ चेंडू निर्धाव टाकले. यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. लखनौ सुपर जायंट्सने हा सामना पाच गडी राखून जिंकला आणि या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. या कामगिरीसाठी शमीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.


