LSG vs SRH Highlights.....
LSG vs SRH Highlights | सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले. अशाप्रकारे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला पाचवा संघ बनला. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत सात गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबादने १८.२ षटकांत चार गडी गमावून २०६ धावा केल्या आणि सामना जिंकला. आता लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाल्याने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ नॉकआऊट सामना खेळणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
हैदराबादचा डाव....
लक्ष्याचा पाठलाग करताना या सामन्यात हैदराबादची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे १३ धावा करून बाद माघारी परतला. यानंतर, अभिषेक शर्माने इशान किशनसह डावाची जबाबदारी घेतली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ८२ धावांची भागीदारी झाली. २० चेंडूत ४ चौकार अन् ६ षटकाराच्या मदतीनं ५९ धावा करून अभिषेक बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने दिग्वेश राठीकरवी झेलबाद केले.
यानंतर इशान किशनला हेनरिक क्लासेनची साथ मिळाली. दोघांनीही काही चांगले फटके मारले आणि ४१ धावा जोडल्या. किशन २८ चेंडूत ३५ धावा काढून बाद झाला तर क्लासेन ४७ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, कामिंदू मेंडिस ३२ धावा काढून रिटायर्ड हर्ट झाला. तो हॅमस्ट्रिंगशी झुंजत असल्याचे दिसून आले. अनिकेत वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी प्रत्येकी पाच धावांवर नाबाद राहिले आणि संघाचा विजय साकारला. लखनौकडून गोलंदाजीत दिग्वेश राठीने दोन तर विल्यम ओ'रोर्क आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
लखनौचा डाव....
तत्पूर्वी, मिचेल मार्श आणि एडेन मार्करम यांनी स्फोटक फलंदाजी करून लखनौला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ११५ धावांची भागीदारी झाली जी हर्ष दुबेने मोडली. त्याने मार्शला आपला बळी बनवले, जो ३९ चेंडूत ६ चौकार अन् ४ षटकारासह ६५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, हर्षल पटेलने मार्करमला त्रिफळाचित केले. तो ३८ चेंडूत (४ चौकार अन् ४ षटकार) ६१ धावा करून बाद झाला. दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. यानंतर मधल्या षटकांमध्ये, सनरायझर्सच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत लखनौच्या धावांवर ब्रेक लावला.
निकोलस पूरनला या सामन्यात सूर गवसला. त्याने १७३.०७ च्या स्ट्राईक रेटने २६ चेंडूत ४५ धावा केल्या तर कर्णधार ऋषभ पंतची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. त्याने फक्त सात धावा केल्या. आयुष बदोनी तीन, अब्दुल समद तीन आणि शार्दुल ठाकूर चार धावा करून बाद झाले. तर, आकाश दीप सहा धावांवर तर रवी बिश्नोई खाते न उघडता नाबाद राहिला. हैदराबादकडून इशान मलिंगाने ४ षटकांत २८ धावा देत २ फलंदाजांना बाद केले. याशिवाय हर्षल पटेलने १ विकेट घेतली. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला. याव्यतिरिक्त हर्ष दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.