IPL 2025 (GT vs PBKS Macth 05 Highlights) :
IPL 2025 (GT vs PBKS Match Highlights) : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) १८ वा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स (GT) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने विजय मिळवला. पंजाबने गुजरातचा ११ धावांनी पराभव केला.
अर्शदीप सिंग आणि विजयकुमार विशाख यांच्या डेथ ओव्हर्समध्ये झालेल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा ११ धावांनी पराभव करून त्यांच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. सोमवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांच्यातील ८१* धावांच्या भागीदारीच्या जोरावर २० षटकांत पाच गडी गमावून २४३ धावा केल्या. आयपीएलमधील पंजाबची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या हंगामात पंजाबने केकेआरविरुद्ध २ बाद २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघाला निर्धारित षटकांत पाच गडी गमावून केवळ २३२ धावा करता आल्या.
या सामन्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. एकेकाळी असे वाटत होते की गुजरातचा संघ २४४ धावांचे लक्ष्य सहज गाठेल, पण शेवटी प्रभावशाली खेळाडू म्हणून गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या विजयकुमार वैशाखने सामन्याचे चित्र पालटून टाकले. त्याने १५व्या आणि १७व्या षटकात प्रत्येकी पाच धावा दिल्या आणि आवश्यक धावगती १३ वरून १७ पर्यंत नेली. पंजाब किंग्जने प्रथम खेळल्यानंतर २४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला फक्त २३२ धावा करता आल्या.
२४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या मदतीने चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मॅक्सवेलने गिलला प्रियांश आर्यकडून झेलबाद केले. त्याने १४ चेंडूत ३३ धावा केल्या.
यानंतर, जोस बटलर आणि साई सुदर्शन यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूत ८४ धावांची भागीदारी झाली, जी अर्शदीप सिंगने मोडली. त्याने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या सलामीवीर सुदर्शनला ७४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर रोखले. या सामन्यात बटलरने ५४, रुदरफोर्डने ४६ आणि राहुल तेवतियाने सहा धावा केल्या. दरम्यान, शाहरुख खान आणि अर्शद खान अनुक्रमे सहा आणि एक धावा काढून नाबाद राहिले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने दोन तर मार्को जॅन्सन आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग चमकले
तत्पूर्वी, श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांच्यातील ८१* धावांच्या भागीदारीमुळे पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंजाबच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांनी सर्वाधिक लक्ष्य वेधले. एकीकडे, अय्यरने ४२ चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये शशांक सिंगने १६ चेंडूत ४४ धावा केल्या. या छोट्या आणि स्फोटक खेळीसाठी त्याचे खूप कौतुक होत आहे. पंजाबसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया प्रियांश आर्यने रचला, ज्याने सलामीवीर फलंदाज म्हणून २३ चेंडूत ४७ धावांची धमाकेदार खेळी केली.
या सामन्यात श्रेयस व्यतिरिक्त, अझमतुल्लाह उमरझाईने १६, मार्कस स्टोइनिसने २० आणि शशांक सिंगने ४४* धावा केल्या. दरम्यान, मॅक्सवेल खाते न उघडताच बाद झाला. यासह, ऑस्ट्रेलियन फलंदाज आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला. तो आयपीएलमध्ये १९ वेळा शून्यावर बाद झाला आहे. गुजरातकडून साई किशोरने तीन तर कागिसो रबाडा आणि रशीद खानने प्रत्येकी एक विकेट घेतली.