IPL 2025 (DC vs RR, Match 32) | सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, मिचेल स्टार्क ठरला हिरो....

आयपीएल २०२५ मध्ये बुधवारी पहिल्यांदा सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरव्दारे लागला. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Thu, 17 Apr 2025
  • 12:19 pm
IPL 2025 news, Sport news, Cricket news,

DC vs RR Highlights...

DC vs RR Highlights : आयपीएल २०२५ मध्ये बुधवारी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला आणि दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरद्वारे विजय मिळवला. दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना २० षटकांनंतर बरोबरीत सुटला, त्यानंतर सुपर ओव्हरद्वारे निकाल देण्यात आला. २०२२ नंतर आयपीएलमध्ये सुपर ओव्हर खेळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

एका रोमांचक सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ११ धावा केल्या होत्या. हे लक्ष्य केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी फक्त चार चेंडूत गाठले आणि दिल्लीला हंगामातील पाचवा विजय मिळवून दिला. २०२२ नंतर पहिल्यांदाच आयपीएल सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागला आहे. त्याआधी, मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकात ९ धावांचा बचाव केला, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला. दरम्यान, या विजयासह दिल्ली संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सहा सामन्यांत पाच विजयांसह त्याचे १० गुण आहेत. 

सुपर ओव्हरचा थरार...

सुपर ओव्हरमध्ये प्रथम राजस्थानकडून हेटमायर आणि रियान पराग मैदानात आले. दिल्लीसाठी स्टार्ककडे गोलंदाजीची धुरा होती. पहिल्या चेंडूवर स्टार्कने एकही धाव दिली नाही. हेटमायरने दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. परागने चौथ्या चेंडूवर चौकार मारण्यात यश मिळवले, जो नो-बॉल ठरला. त्यानंतर पुढील चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात रियान धावबाद झाला. त्याच वेळी, पाचव्या चेंडूवर, हेटमायरने एकेरी धावेचे दुहेरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्याचा नादात आपली विकेट गमावली आणि राजस्थान संघाने सुपर ओव्हरमध्ये २ बाद ११ धावा केल्या. प्रत्युत्तरात राहुल आणि स्टब्सच्या जोडीने १२ धावांचे लक्ष्य फक्त ४ चेंडूत पूर्ण केले. राहुलने संदिप शर्माच्या पहिल्या चेंडूवर दोन तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर 1 धाव घेत स्टब्सला स्ट्राईक दिली आणि स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारत विजय साकारला.

स्टार्कची शेवटची षटकात शानदार कामगिरी...

राजस्थान रॉयल्सला विजयासाठी शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती. हेटमायर आणि ध्रुव जुरेलची जोडी क्रीजवर होती. दिल्लीसाठी मिचेल स्टार्कने गोलंदाजीची धुरा सांभाळली. स्टार्कने पहिल्या दोन चेंडूत दोन धावा दिल्या. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हेटमायरने दोन धावा काढल्या. चौथ्या चेंडूवरही दोन धावा झाल्या. स्टार्कने एकामागून एक यॉर्कर्स टाकले, ज्याचे उत्तर हेटमायर किंवा ज्युरेल दोघांकडेही नव्हते. पाचव्या चेंडूवरही एक धाव मिळाली. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. स्टार्कने आणखी एक यॉर्कर टाकला, ज्यावर ध्रुवने बॅटला चेंडू लागताच धावण्यास सुरूवात केली. दरम्यान, जुरेल आणि हेटमायर पहिली धाव पूर्ण केली, पण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात  ध्रुव धावबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. अशाप्रकारे राजस्थान संघाला २० षटकांत ४ गडी गमावून १८८ धावाच करता आल्या.

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स चांगल्या स्थितीत होते पण दिल्लीच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये खेळाचे चित्र पालटून टाकले आणि सामना बरोबरीत सोडवला. यादरम्यान, संजूने १९ चेंडूत ३१ धावा केल्या आणि दुखापतीनंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. यशस्वीने शानदार फलंदाजी केली आणि ३७ चेंडूत (३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार) ५१ धावा केल्या. रियान परागला बॅटने काही खास करता आले नाही आणि तो ८ धावा करून बाद झाला. तथापि, यानंतर नितीश राणाने जबाबदारी स्वीकारली आणि दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. नितीशने फक्त २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नितीश २८ चेंडूत ५१ धावा करून तर  ध्रुव जुरेल १७ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. शिमरॉन हेटमायर १५ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्क, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अभिषेक-राहुलने खेळली महत्वपूर्ण खेळी...

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. जॅक फ्रेझर मॅकगर्क फक्त ९ धावा करून माघारी परतला. त्यानंतर करुण नायर दुर्दैवी ठरला आणि खाते न उघडताच तो धावबाद झाला. यानंतर, अभिषेक पोरेल आणि केएल राहुल यांनी जबाबदारी स्वीकारली आणि तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अभिषेकने ३७ चेंडूत ४९ धावा केल्या. तर, राहुलने ३२ चेंडूत ३८ धावा केल्या. अक्षर पटेलने १४ चेंडूत ३४ धावांची दमदार खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये, ट्रिस्टन स्टब्सने १८ चेंडूत ३४ धावा फटकावल्या, ज्यामुळे दिल्लीला २० षटकांत ५ गडी गमावून १८८ धावसंख्येपर्यत मजल मारता आली. राजस्थानकडून गोलंदाजीत आर्चरने दोन, तर महेश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share this story

Latest