Munaf Patel
Munaf Patel IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये बुधवारी एक रोमांचक सामना झाला जिथे यजमान दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले होते, ज्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पंचांशी झालेल्या वादाबद्दल मुनाफला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्याच्या सामन्याच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.
खरंतर, या सामन्याबाबत त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सीमारेषेजवळ चौथ्या पंचाशी वाद घालताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून असे वाटते की तो पंचाने सांगितलेल्या गोष्टीवर रागावला आहे. असे म्हटले जात आहे की त्याला त्याच्या संघातील एका खेळाडूद्वारे मैदानावर संदेश द्यायचा होता, परंतु पंचांनी त्याला तसे करण्याची परवानगी दिली नाही. यानंतरच तो पंचांशी भांडला.
Munaf Patel had a heated exchange with the 4th umpire during the #DCvRR match at the Arun Jaitley Stadium, Delhi after the umpire denied sending a player to enter the ground to convey his message.#DCvsRR #IPL2025 pic.twitter.com/hHv0tNAUvd
— Gaurav Chaudhary (@gkctweets) April 16, 2025
मुनाफने मान्य केली आपली चूक
मुनाफ पटेलने कलम २.२० अंतर्गत लेव्हल १ च्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, त्यामुळे सुनावणीची आवश्यकता भासली नाही. बीसीसीआयने मुनाफ पटेलबाबतच्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मुनाफ पटेलने लेव्हल १ चा गुन्हा स्वीकारला आहे आणि मॅच रेफरीने दिलेला निर्णयही स्वीकारला आहे.'
स्टार्क ठरला दिल्लीच्या विजयाचा नायक...
या रोमांचक सामन्यात, एकेकाळी राजस्थान विजयाकडे वाटचाल करत होते, पण नंतर कांगारूंचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क त्यांच्यासमोर आला. स्टार्कच्या वेगवान अन् अचूक गोलंदाजीमुळेच शेवटच्या षटकात राजस्थानच्या फलंदाजांना नऊ धावाही काढता आल्या नाहीत. सामना बरोबरीत सुटल्यानंतर, त्याने सुपर ओव्हरमध्येही आपली ताकद दाखवली आणि रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरला फक्त ११ धावा करू दिल्या. दिल्लीच्या फलंदाजांनी हे लक्ष्य फक्त चार चेंडूत पूर्ण केले आणि हंगामातील त्यांचा पाचवा विजय मिळवला.