भारतीय कर्णधाराची पराभवानंतर बहाणेबाजी...
फायनल इंग्लंडमध्येच का? जूनमध्येच का?
भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने ४३ धावा केल्या. फिरकीपटू नाथन लियाॅनच्या चेंडूवर खराब शॉट खेळून तो बाद झाला. पराभवानंतर पत्रकारांशी बोलताना रोहितने डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडमध्येच खेळवण्यात येत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. पुढील डब्ल्यूटीसी फायनल इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवली जाईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आधीच जाहीर केले आहे. यावर रोहित म्हणाला, ‘‘हा सामना कुठेही होऊ शकतो. फायनल जूनमध्ये होऊ नये. ती वर्षभरात कधीही होऊ शकते. अंतिम लढत फक्त इंग्लंडमध्येच नाही तर कुठेही होऊ शकते.’’
एका अंतिम सामन्याऐवजी तीन सामन्यांची मालिका असावी
ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर रोहित म्हणाला, ‘‘डब्ल्यूटीसीच्या एका अंतिम सामन्याऐवजी तीन सामन्यांची मालिका व्हायला हवी. आम्ही कठोर परिश्रम केले. घरच्या मैदानावर मोठ्या संघांना कडवी झुंज दिली. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलो पण फक्त एक सामना खेळून चॅम्पियनशिप गमावली. मला वाटते की पुढील डब्ल्यूटीसी मालिकेचा अंतिम सामना ‘बेस्ट ऑफ थ्री’ पद्धतीने व्हावा.’’
तयारीसाठी २०-२५ दिवस हवे
जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम लढतीसारख्या महत्त्वाच्या सामन्याच्या तयारीसाठी २० ते २५ दिवस मिळायला हवे, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले. ‘‘मागच्या वेळी इंग्लंडमध्ये आम्ही असेच केले होते आणि तुम्ही निकाल पाहिला होता. आम्हाला तयारीसाठी जास्त दिवस मिळायला हवे होते,’’ असे रोहित म्हणाला. अशी अनेक कारणे सांगणाऱ्या रोहितने संघाच्या अनावश्यक अशा अत्यंत आक्रमक फलंदाजीबद्दल बोलायचे टाळले. ‘‘आम्ही आमच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याचा संदेश दिला होता. कसोटी असो, टी-२० असो वा वनडे, आम्हाला दडपण घ्यायचे नाही. तुम्ही अशा मानसिकतेने खेळलात तर ऑलआऊट होण्याची शक्यता असते. आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळायचे होते,’’ असे रोहितने नमूद केले.