भारताच्या विंडीज दौऱ्याची सुरुवात कसोटीने
#मुंबई
भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या लढती उभय संघांत रंगणार असून या दौऱ्याचा प्रारंभ कसोटीने होणार आहे.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून सुरू होणार आहे. २७ जुलैपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. त्यानंतर भारत आणि यजमान विंडीज यांच्यात ५ टी-२० लढतींचा थरार रंगणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर टीम इंडिया महिनाभर क्रिकेट खेळणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात संघ वेस्ट इंडिजला रवाना होईल. पहिला कसोटी सामना १२ ते १६ जुलैदरम्यान डॉमिनिका येथील विंडसर पार्कवर खेळवला जाईल. दुसरा सामना २० ते २४ जुलैदरम्यान त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील.
दोन्ही देशांच्या कसोटी संघाची जूनच्या शेवटच्या आठवड्यात निवड होऊ शकते. डब्ल्यूटीसी फायनलमधील मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडिया कसोटी संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देईल, असे मानले जात आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी पाहता यशस्वी जैस्वाल, रिंकूसिंग आणि जितेश शर्मा या नवीन फलंदाजांना मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळू शकते.