ओव्हलवर भारताचे रेकाॅर्ड यथातथा

तमाम क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या ७ ते ११ तारखेदरम्यान ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावरील भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता ही लढत या संघासाठी आव्हानात्मक ठरू शकते. कारण, कसाटी सामन्यांमध्ये येथे भारताची कामगिरी अतिशय वाईट ठरली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 3 Jun 2023
  • 01:06 pm
ओव्हलवर भारताचे रेकाॅर्ड यथातथा

ओव्हलवर भारताचे रेकाॅर्ड यथातथा

जागतिक कसोटी मालिकेचा अंतिम सामना होत असलेल्या मैदानावर भारत आतापर्यंत १४ पैकी केवळ २ लढतीत विजयी

#ओव्हल

तमाम क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या ७ ते ११ तारखेदरम्यान ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावरील भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता ही लढत या संघासाठी आव्हानात्मक ठरू शकते. कारण, कसाटी सामन्यांमध्ये येथे भारताची कामगिरी अतिशय वाईट ठरली आहे.  

टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत यजमान इंग्लंडविरुद्ध एकूण १४ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला केवळ २ सामने जिंकता आाले. ५ सामने इंग्लंड संघाने जिंकले तर उर्वरित ७ सामने अनिर्णित सुटले. ओव्हलवरील भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियासारख्या दर्जेदार संघाविरुद्ध विजय मिळवणे टीम इंडियासाठी सोपे नसेल.

ओव्हलच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही फारसा चांगला नाही. मात्र, त्यांची कामगिरी भारतापेक्षा बरी म्हणावी लागेल. कांगारूंनी ओव्हलवर ३८ पैकी केवळ ७ सामने जिंकले आहेत. १७ सामन्यांत त्यांना परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले. उर्वरित १४ सामने अनिर्णित अवस्थेत सुटले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड-टू-हेड कामगिरी बघता ऑस्ट्रेलिया सरस ठरतो. दोन्ही संघ आपसांत १०६ सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने ४४ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, भारताला ३२ सामने जिंकण्यात यश आले आहे. याशिवाय दोन्ही संघांमधील २९ सामने अनिर्णित सुटले. उर्वरित एक सामना ‘टाय’ झाला होता. 

भारतासाठी थोडी दिलासादायक बाब म्हणजे, टीम इंडियानं ओव्हलवरील खेळलेला आपला  शेवटचा सामना जिंकला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लडचा १५७ धावांनी धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने १२७ धावांची शानदार शतकी खेळी केली होती. तोच ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता.  

इतिहास कसाही असला तरी यावेळी अंतिम सामना जिंकून भारताला मागील १० वर्षांतील ‘आयसीसी ट्राॅफी’चा दुष्काळ संपवायचा आहे. २०१३ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव करीत विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर मात्र टीम इंडिया आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन होऊ शकलेली नाही. यावेळी टीम इंडियानं कांगारूंच्या संघावर मात करून जेतेपद मिळवलं, तर १० वर्षांपासूनचा दुष्काळ संपवून भारतीय संघ प्रथमच कसोटीतील जगज्जेतेपदाचा किताब पटकावेल.

टीम इंडियाला २०१४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१६ मध्ये टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलध्येही टीम इंडिया अपयशी ठरली. याशिवाय २०२१ आणि २०२२ चा टी-२० विश्वचषकही टीम इंडियासाठी निराशाजनक होता.

कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर असून कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतिहास कोणाच्याही बाजूने असाे. येत्या ७ ते ११ तारखेदरम्यान होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेचा उभय सघांतील अंतिम सामना अत्यंत रंगतदार व्हावा, अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या सामन्यातील भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनादकट

राखीव खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story