सलग दुसऱ्यांदा भारताचा स्वप्नभंग...
#लंडन
सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेची अंतिम फेरी गाठूनही दोन्ही वेळा भारताला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले आहे. रविवारी (दि. ११) भारतावर २०९ धावांनी मोठा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने कसोटी प्रकारातील जगज्जेतेपदाला गवसणी घातली. याबरोबरच आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा क्रिकेटविश्वातील पहिलाच संघ ठरला.
विश्वविजेतेपदासाठी दुसऱ्या डावात ४४४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रामध्ये २३४ धावांवर गारद झाला. स्टार, सुपरस्टार फलंदाजांचा समावेश असलेल्या या संघातील एकालाही खेळपट्टीवर ठाण मांडून अखेरपर्यंत झुंज देता आली नाही. विराट कोहली (४९), अजिंक्य रहाणे (४६), रोहित शर्मा (४३) आणि चेतेश्वर पुजारा (२७) यांना खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही मोठी खेळी करण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियातर्फे दिग्गज फिरकीपटू नाथन लियाॅन याने ४१ धावांत सर्वाधिक ४ गडी बाद केले. या सामन्यासाठी ऐनवेळी संधी मिळालेला वेगवान गोलंदाज स्काॅट बोलॅंडने ३, मिचेल स्टार्कने २ तर कर्णधार पॅट कमिन्सने एक बळी घेत विजयात वाटा उचलला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ संघर्ष करीत असताना १६३ धावांची आक्रमक शतकी खेळी करीत आपल्या संघाला मोठी धावसंख्यस उभारून देणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला.
ॲास्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्यानंतर भारताला २९६ धावांवर रोखत १७३ धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित करीत कांगारूंनी भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे अवघड आव्हन ठेवले होते. चौथ्या दिवसअखेर भारताने ३ बाद १६४ अशी दमदार मजल मारत संघर्षाचे संकेत दिले होते. मात्र, रविवारी पाचव्या दिवसाच्या खेळात २०.३ षटकांमध्ये ७० धावांत भारताने आपले उर्वरित ७ फलंदाज गमावत शरणागती पत्करली.
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात चौथ्या गड्यासाठी झालेली ८६ धावांची भागिदारी भारतातर्फे सर्वाधिक ठरली. अजिंक्यने १०८ चेंडूंत ७ चौकारांसह ४६ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात त्याला तोलामोलाची साथ देणाऱ्या शार्दुल ठाकूरला या डावात भोपळाही फोडता आला नाही. रवींद्र जडेजाही शून्यावर बाद झाला. बोलॅंडने विराट आणि जडेजा यांना एकाच षटकात बाद करीत भारताचा पराभव निश्चित केला. त्याच्या गोलंदाजीवर विराटने स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेल दिला. बोलॅंडने डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजाला आऊट स्विंग टाकला. जडेजाच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. काही काळाने स्टार्कने अजिंक्यला माघारी धाडत भारताचा प्रतिकारही संपवला. अजिंक्यला चेंडू गुड लेंथच्या बाहेरून खेळायचा होता, पण चेंडू बॅटची बाहेरील कड घेऊन यष्टीरक्षक कॅरीकडे गेला. मोहम्मद सिराजला (१) बोलॅंडकरवी झेलबाद करीत लियाॅनने भारताच्या डावाला पूर्णविराम दिला.
वृत्तसंस्था
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ४६९.
भारत : पहिला डाव : २९६.
ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : ८४.३ षटकांत ८ बाद २७०
धावांवर घोषित.
भारत : दुसरा डाव : ६३.३ षटकांत २३४ (विराट कोहली ४९, अजिंक्य रहाणे ४६, रोहित शर्मा ४३, चेतेश्वर पुजारा २७, श्रीकर भरत २३, शुभमन गिल १८, मोहम्मद शमी १३, मोहम्मद सिराज १, उमेश यादव १, शार्दुल ठाकूर ०, रवींद्र जडेजा ०, नाथन लाॅयन ४/४१, स्काॅट बोलॅंड ३/४६, मिचेल स्टार्क २/७७, पॅट कमिन्स १/५५).
सामनावीर : ट्रॅव्हिस हेड