आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत?
#नवी दिल्ली
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दिलेल्या आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील भारताचे सामने पाकिस्तानबाहेर श्रीलंकेत खेळवण्याच्या प्रस्तावाला आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) मान्यता देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पीसीबीने आशिया चषकातील भारताचे सर्व सामने श्रीलंकेत आणि उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला असून एसीसी याबाबत सकारात्मक आहे. येत्या मंगळवारी (दि. १३) याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. एसीसीने हा प्रस्ताव मंजूर केल्यास पाकिस्तानचा विश्वचषक भारतात खेळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
एसीसी कार्यकारी मंडळाचे सदस्य, ओमान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पंकज खिमजी यांनी पीटीआयला सांगितले की, ‘‘बहुतेक देश हायब्रिड मॉडेलच्या विरोधात आहेत, पण आता परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान-नेपाळ, अफगाणिस्तान-बांगलादेश, अफगाणिस्तान-श्रीलंका आणि श्रीलंका-बांगलादेशचे सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर व्हायला हरकत नाही.’’
श्रीलंकेच्या गाॅल मैदानावर भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे. ‘‘भारत-पाकिस्तान सामन्यांव्यतिरिक्त, श्रीलंकेविरुद्धचा सुपर फोर सामना गाॅलच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो.
आशिया चषकाचा वाद का? तोडगा काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२३ च्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे. ही स्पर्धा जाहीर होताच भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. बीसीसीआयने आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली होती, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ते मान्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे सामने पाकिस्तान सोडून अन्य देशात होणार आहेत. या स्पर्धेतील उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. भारत फायनलमध्ये पोहोचला तर फायनलही पाकिस्तानच्या बाहेर असेल.
वृत्तसंस्था