संग्रहित छायाचित्र
बर्मिंगहॅम: वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्सच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभव करीत विजेतेपद पटकावले. अर्धशतक झळकावणारा अंबाती रायुडू आणि पाकिस्तानचे तीन बळी घेणारा अनुरितसिंग भारताच्या विजेतेपदाचे शिल्पकार ठरले.
बर्मिंगहॅममध्ये शनिवारी रात्री उशिरा संपलेल्या या सामन्यात प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीच्या क्षेत्रात सरस कामगिरी करून भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवले. पाकिस्तानने ६ गडी गमावून १५६ धावा केल्यानंतर भारतीय संघाने १९.१ षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात १५९ धावा फटकावत विजेतेपद साकारले.
पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाक संघाने दीडशेपार मजल मारली तेव्हाच भारतीय संघ या सामन्यात बाजी मारणार, हे जवळपास निश्चित झाले होते. कारण, संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली. या विजयासह साखळी फेरीत पाकिस्तानकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचीदेखील सव्याज परतफेड भारताने केली.
१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. उथप्पा आणि अंबाती यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. उथप्पा (१०) आणि रैना (४) एकाच षटकात चार धावांच्या फरकाने बाद झाले. त्यानंतर अंबाती रायुडूने सामन्याची सुत्रे आपल्याकडे घेत भारताचे विजेतेपद निश्चित केले. त्याच्या ५० धावांपाठोपाठ गुरकीरत सिंगने ३३ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. त्याने १ षटकार आणि २ चौकार लगावले. यानंतर युसूफ पठाणने अवघ्या १६ चेंडूंत ३० धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने ३ षटकार आणि एका चौकाराची आतषबाजी केली. कर्णधार युवराज सिंग २२ चेंडूंत नाबाद १५) आणि इरफान पठण (४ चेंडूंत नाबाद ५, १ चौकार) यांनी भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानकडून आमिर यामिनने दोन तर सईद अजमल, वहाब रियाझ आणि शोएब मलिकने प्रत्येकी एक बळी घेतला.
पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्याने ३६ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार लगावले. भारताकडून अनुरीत सिंगने तीन बळी घेतले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर शार्जिल खान १० चेंडूत १२ धावा करून दुसऱ्या षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतला. मकसूदने १२ चेंडूत २१ धावा केल्या. कामरान अकमल १९ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. कर्णधार युनूस खानला ११ चेंडूत केवळ ७ धावा करता आल्या.
भारतीय संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा ८६ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. याआधी पाकिस्तानने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा २० धावांनी पराभव केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या साखळी सामन्यात पाकिस्तानने ६८ धावांनी सरशी साधली होती. त्याची व्याजासह परतफेड करताना भारताने अंतिम फेरीत पाकला धूळ चारून विजेतेपदाचा चषक उंचावला. वृत्तसंंस्था
संक्षिप्त धावफलक :
पाकिस्तान : २० षटकांत ६ बाद १५६ (शोएब मलिक ४१, कामरान अकमल २४, मकसूद २१, अनुरितसिंग ३/४३, इरफान पठाण १/१२, पवन नेगी १/२४, विनय कुमार १/३६) पराभूत वि. १९.१ षटकांत ५ बाद १५९ (अंबाती रायुडू ५०, गुरकिरतसिंग मान ३४, युसूफ पठाण ३०, युवराजसिंग नाबाद १५, राॅबीन उथप्पा १०, इरफान पठाण नाबाद ५, सुरेश रैना ४, शोएब मलिक १/१७, वहाब रियाझ १/२२, सईद अजमल १/२५).
अनुरितसिंगचा प्रभावी मारा
भारताकडून अनुरितसिंगने ४ षटकांत ४३ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याने सलामीवीर फलंदाज शार्जिल खानला १२ धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने आमिर यामीन (७) आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (४१) यांच्या महत्वपूर्ण विकेट घेतल्या. यामुळे पाकिस्तानला मोठी मजल मारता आली नाही. इरफान पठाण, पवन नेगी आणि विनयकुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेत अनुरितला चांगली साथ दिली.
अंबाती रायुडूच्या ५० धावा ठरल्या निर्णायक अर्धशतक
भारताकडून रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू सलामीला आले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावा जोडल्या. त्यानंतर उथप्पाला आमिर यामीनने बाद केले. पण रायुडूने एक बाजू लावून धरत शानदार फलंदाजी केली. त्याने ३० चेंडूंत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५० धावांची निर्णायक खेळी केली. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.