- केएल राहुलच्या पाठोपाठ ध्रुव जुरेल आणि जडेजाचे नाबाद शतक
- गोलंदाजीत सिराज आणि बुमराहचा भेदक मारा
IND vs WI Day-2 Highlights : भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने २८६ धावांची आघाडी घेतली आहे. अहमदाबादमधे सुरु असलेल्या या सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारताने वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावा झाल्या होत्या. रवींद्र जडेजा १०४(१७६ चेंडू) धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर नऊ धावांवर नाबाद परतले.
आजचा दिवस भारतासाठी खूप चांगला होता. २ बाद १२१ धावांवरून सुरुवात करताना त्यांनी आज धावसंख्येत आणखी ३२७ धावांची भर टाकली आणि तीन विकेट गमावल्या. शुभमन गिल, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांच्या रूपात भारताला तीन धक्के सहन करावे लागले. यशस्वी जयस्वाल (५४ चेंडूत ३६ धावा) आणि साई सुदर्शन (१९ चेंडूत ७ धावा) गुरुवारीच माघारी परतले होते.
गिलने आज अर्धशतक झळकावले. तो १०० चेंडूत ५० धावा काढून बाद झाला. यानंतर, केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले. तो १२ चौकारांच्या मदतीने १०० धावा काढून बाद झाला. दरम्यान, ध्रुव जुरेलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो १५ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १२५ धावा काढून बाद झाला. याचबरोबर ध्रुव जुरेल कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील टीम इंडियाकडून शतक ठोकणारा १२वा यष्टीरक्षक ठरला आहे. दरम्यान, उपकर्णधार जडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. यादरम्यान जडेजानं ६ चौकार अन् ५ षटकार लगावले आहेत. वेस्ट इंडिजने त्यांच्या पहिल्या डावात १६२ धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाची एकूण आघाडी आता २८६ धावांवर पोहोचली आहे. -वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेज याने २ तर जोमेल वारिकन, खैरी पियरे आणि जेडेन सील्स यांनी प्रत्येकी १ बळी घेतला आहे.
भारताचा भेदक मारा….
तत्पूर्वी ,पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर संपुष्टात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या तासात त्यांनी ४२ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. सिराजने तेजनारायण चंद्रपॉल (०), ब्रँडन किंग (१२) आणि अॅलिक अथानाझे (१३) यांना बाद केले, तर बुमराहने जॉन कॅम्पबेल (८) याला बाद केले. त्यानंतर कर्णधार रोस्टन चेस आणि शाई होप यांनी पाचव्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. होपला कुलदीप यादवने बाद केले आणि पंचांनी लंच घेण्याचा निर्णय घेतला. होपने २६ धावा केल्या.
दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसला सिराजने २४ धावांवर बाद केले. त्यानंतर सुंदरने खारी पियरे (११) ला पायचीत केले. त्यानंतर बुमराहने जस्टिन ग्रीव्हज (३२) आणि जोहान लायन (१) यांना दोन घातक यॉर्कर मारून क्लीन बोल्ड केले. कुलदीपने वॉरिकन (८) ला यष्टीरक्षक ज्युरेलकरवी झेलबाद करून वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर संपुष्टात आणला.
वेस्टइंडिजचा संघ साडेचार तासांपेक्षा कमी वेळात सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीप यादवने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.
भारतात राहुलचे दुसरे शतक
साल २०१६ नंतर भारतात केलेले राहुलचे हे पहिले शतक आहे. यापूर्वी त्याने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध १९९ धावा केल्या होत्या. या काळात त्याने ११ अर्धशतके झळकावली होती, मात्र ती शतकांत रूपांतरित करण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये राहुलचे हे फक्त दुसरे शतक आहे. राहुलनं शतक झळकवल्यानंतर शिट्टी वाजवून सेलिब्रेशन केले. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये राहुल सातत्याने चमकला आहे. आठ कसोटी सामन्यांतील ११ डावांत त्याने ४५० पेक्षा जास्त धावा केल्या असून त्याची सरासरी ५१ पेक्षा जास्त आहे. २०१६ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध १५८ धावांची खेळी केली होती. या शतकामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची शतकांची संख्या दोन झाली आहे. तसेच, त्याने या संघाविरुद्ध दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.
बुमराहने रचला विक्रम…
या सामन्यात जसप्रीत बुमराहने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या. त्याने जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लेयान या फलंदाजांना बाद केले. पहिल्याच कसोटी सामन्यात १४ षटकांत ४२ धावा देत एकूण ३ गडी बाद केले. दोघांना तर त्याचा यॉर्कर चेंडूत कळला नाही. बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय भूमीवर ५० विकेट्स पूर्ण केल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घरच्या मैदानावर ५० विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. या आधी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने १४९ आणि रवींद्र जडेजाने ९४ विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घरच्या मैदानावर एकूण १३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५० विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात ४५ धावा देऊन ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.


