संग्रहित छायाचित्र....
IND vs ENG ODI series 2025 | भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली होती. पण आता बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. संघासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बुमराहला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची होती. पण आता हा स्टार गोलंदाज या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे.
बीसीसीआयने केले जाहीर...
जसप्रीत बुमराहला संघातून वगळल्याची बीसीसीआयने अधिकृत माहिती मंगळवारी(दि.04) ट्विटरवरून दिली आहे. बुमराहला वगळल्यानंतर वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. सोमवारी, जसप्रीत बुमराह बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि बुमराह पुढील २-३ दिवस बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली राहणार आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
— BCCI (@BCCI) February 4, 2025
Varun Chakaravarthy added to India’s squad for ODI series against England.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत वरुणने शानदार कामगिरी केली होती. त्याने मालिकेत १४ विकेट्स घेतल्या. यामुळे त्याला आता एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. जर चक्रवर्तीने या मालिकेत चांगली कामगिरी केली तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्येही स्थान मिळू शकते.
एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना ९ फेब्रुवारी रोजी ओडिशामध्ये खेळला जाईल. तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेनंतर, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल. टीम इंडिया २० फेब्रुवारीपासून या मेगा स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, जिथे त्यांचा सामना बांगलादेशशी होईल. यानंतर, २३ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा महान सामना खेळला जाईल.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा नवीनतम संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), युवराज गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.