IND vs ENG 1st T20 | वरुण-अर्शदीपनंतर अभिषेक शर्मा चमकला, भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सनी दमदार विजय....

कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारताचा हा सलग सातवा टी-20 आंतरराष्ट्रीय विजय आहे. यासह टीम इंडियाने पाकिस्तानची बरोबरी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 10:11 am
 IND vs ENG 1st T20,

IND vs ENG 1st T20 Match...

IND vs ENG 1st T20 2025 Highlights : कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. अभिषेक शर्माने टीम इंडियासाठी धमाकेदार कामगिरी केली. त्याने 79 धावांची स्फोटक खेळी खेळली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  मालिकेतीस दुसरा सामना आता शनिवारी (25 जानेवारी) चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियम होणार आहे. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी घातक गोलंदाजी केली. अक्षर पटेलनेही आपली जादू दाखवली.

इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला आले. भारताने चांगली सुरुवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. दरम्यान, सॅमसन 26 धावा करून बाद झाला. त्याने 20 चेंडूंचा सामना केला आणि यादरम्यान 4 चौकार आणि 1 षटकार मारला. कर्णधार सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. त्याला जोफ्रा आर्चरने शून्यावर बाद केले. अभिषेकने शानदार कामगिरी केली आणि 79 धावांची खेळी केली. अभिषेकचा डाव आदिल रशीदने संपवला. त्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. तिलक वर्मा 19 धावा करून तर हार्दिक पांड्या ३ धावा करून नाबाद राहिला आणि भारतानं 12.5 षटकांत 3 बाद 133 धावा करत लक्ष्य सहज गाठलं. इंग्लंडकडून आर्चरने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 21 धावा देत 2 बळी घेतले. आदिल रशीदलाही यश मिळाले. त्याने 2 षटकांत 27 धावा दिल्या. याशिवाय कोणालाही विकेट मिळाली नाही.

अभिषेकचे भारतासाठी विक्रमी अर्धशतक...

भारताकडून अभिषेक शर्माने मॅचविनर खेळी केली. त्याने फक्त 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने 34 चेंडूंचा सामना करत 79 धावा केल्या. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार लगावले.   यासह, अभिषेक आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्तरित्या तिसरा भारतीय फलंदाज बनला.

भारताकडून सर्वात जलद टी-20 अर्धशतक करणारे फलंदाज....

सूर्यकुमार यादव विरूध्द द.आफ्रिका, 18 चेंडूत अर्धशतक (गुवाहटी, 2022)

गौतम गंभीर विरूध्द श्रीलंका, 19 चेंडूत अर्धशतक (नागपूर,2009)

अभिषेक शर्मा विरूध्द इंग्लंड 20 चेंडूत अर्धशतक (कोलकाता 2025)

युवराज सिंह विरूध्द श्रीलंका 20 चेंडूत अर्धशतक (मोहाली 2009)

इंग्लंडकडून बटलरची अर्धशतकी खेळी

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकात सर्वबाद 132 धावा केल्या होत्या. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर फिल साल्ट शून्यावर बाद झाला. तर बेन डकेट 4 धावा करून माघारी परतला. पण जोस बटलरने डाव सावरला. त्याने अर्धशतक झळकावले. बटलरने 44 चेंडूत सर्वाधिक 68 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. हॅरी ब्रुकने 17 धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. इंग्लंडच्या फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. आर्चरने 12 धावांचे तर आदिल रशीदने 08 धावांचे योगदान दिले.

भारतीय गोलंदाजांनी केला कहर...

कोलकात्यात टीम इंडियाचे गोलंदाज चमकदारपणे चमकले. वरुण चक्रवर्तीने 4 षटकांत 23 धावा देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर अर्शदीप सिंगने 4 षटकांत 17 धावा देत 2 बळी घेतले. तसेच अक्षर पटेलने 4 षटकांत 22 धावा देत 2 बळी घेतले. त्याने यादरम्यान एक षटक निर्धाव टाकले. हार्दिक पंड्यानेही 2 फलंदाज बाद केले.

अर्शदीपच्या नावावर खास विक्रमाची नोंद...

कोलकात्यात 2 विकेट घेत अर्शदीप सिंगने आपल्या नावावर एक खास विक्रम केला. तो भारतासाठी सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत 97 विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्यानं युजवेंद्र चहलसह अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे.

टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी

अर्शदीप सिंह 97*

युजवेंद्र चहल 96

भुवनेश्वर कुमार 90

जसप्रीत बुमराह 89

हार्दिक पांड्या 89

ईडन गार्डन्सवर भारताचा सलग सातवा टी-20  विजय

कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारताचा हा सलग सातवा टी-20 आंतरराष्ट्रीय विजय आहे. यासह टीम इंडियाने पाकिस्तानची बरोबरी केली आहे. खरं तर, 2008-21 दरम्यान कराचीच्या मैदानावर पाकिस्तानने एकूण सात सामने जिंकले होते. इंग्लंडचा संघ या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. या संघाने 2010-21 दरम्यान कार्डिफमध्ये सलग आठ सामने जिंकले होते.

Share this story

Latest