अखेरच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅट तळपली
#लंडन
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशप (डब्ल्यूटीसी) २०२३ च्या शेवटच्या सामन्यात पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने विक्रमी शतक झळकावत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. दुसरा दिवस सुरू होताच स्मिथने आपले शतक झळकावले आणि १२१ धावा करत बाद झाला. त्याने या शतकाच्या जोरावर अनेक विक्रम मोडले. त्याने रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरी केली.
भारताविरुद्ध शतक झळकावून स्मिथने रोहित शर्मा, शेन वॉटसन आणि महेला जयवर्धने यांसारख्या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली. स्मिथचे आयसीसी बाद फेरीतील दुसरे शतक ठरले. या खेळीनंतर स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावाही पूर्ण केल्या. स्मिथचे हे भारताविरुद्धचे १४ वे आंतरराष्ट्रीय शतक होते आणि त्याने रिकी पाँटिंगची (१४ शतके) बरोबरी केली. स्मिथने आतापर्यंत कसोटीत ९ तर भारताविरुद्ध वनडेत ५ शतके झळकावली आहेत.
आयसीसीच्या बाद फेरीत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
सौरव गांगुली- ३ रिकी पाँटिंग-३
सईद अन्वर-३ स्टीव्ह स्मिथ-२
महेला जयवर्धने-२ रोहित शर्मा-२
शेन वॉटसन-२
आयसीसीच्या बाद फेरीत स्टीव्ह स्मिथने केलेली धावसंख्या
२०१५ विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानविरुद्ध ६५ धावा
२०१५ विश्वचषक उपांत्य फेरीत भारताविरुद्ध १०५ धावा
२०१५ विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५६ धावा
२०१९ विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ८५ धावा
२०२१ टी-२० विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ५ धावा
२०२३ डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताविरुद्ध १२१ धावा
या दिग्गजांच्या विक्रमाशी केली बरोबरी
स्मिथने आयसीसी बाद फेरीतील आपले दुसरे शतक झळकावले. यापूर्वी २०१५ मध्ये त्याने एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध १०५ धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या डावात त्याने २६८ चेंडूंचा सामना केला आणि १९ चौकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या. स्मिथ आता आयसीसी बाद फेरीत (नॉक आउट) दोन शतके झळकावणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, शेन वॉटसन आणि महेला जयवर्धने यांनी अशी कामगिरी केली आहे. त्याच वेळी, सौरव गांगुली, रिकी पाँटिंग आणि सईद अन्वर यांनी आयसीसीच्या बाद फेरीत प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत.
या दिग्गजांच्या विक्रमाशी केली बरोबरी
विराट कोहलीने स्टीव्हबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. मला वाटते की स्टीव्ह स्मिथ हा या पिढीतील सर्वोत्तम कसोटीपटू आहे आणि दीर्घकाळ या क्षेत्रात सातत्याने चांगले प्रदर्शन करणे ही सोपी गोष्ट अजिबात नाही. त्याने त्याच्याकडे असलेली फलंदाजीतील अनुकूलता सिद्ध केली आहे. तुम्ही जर या पिढीतील जास्तीत जास्त कसोटी क्रिकेटपटू पाहिले तर त्याचा रेकॉर्ड सर्वांना माहीत आहे. ८५ किंवा ९० कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी ६० आहे, जी अत्यंत शानदार अशी आहे. स्टीव्ह स्मिथ ज्या जिद्द आणि चिकाटीने धावा करतो, मी गेल्या १० वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये इतर कोणत्याही फलंदाजाने असे केलेले पाहिले नाही. याचे श्रेय त्याच्या कौशल्याला आणि स्वभावाला जाते. तुम्ही त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूला शक्य तितक्या लवकर बाद करण्याचा प्रयत्न करा, कारण तो जर बराच काळ खेळला तर तो सामन्यात बराच प्रभाव पाडू शकतो, असेही विराट म्हणाला आहे.