संग्रहित छायाचित्र....
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यासाठी दावा मजबूत...
#बेकेनहॅम | इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी खेळल्या गेलेल्या इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्यात भारत अ संघाकडून शार्दुल ठाकूरने ६८ चेंडूत नाबाद १२२ धावांची शानदार आक्रमक खेळी केली. हे आक्रमक शतक झळकावत त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आपला दावा मजबूत केला.
या सामन्यात भारत अ संघाकडून शतक करणारा ३३ वर्षीय शार्दुल हा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी, सर्फराझ खानने दुसऱ्या दिवशी ७६ चेंडूत २ षटकार आणि १५ चौकारांसह १०१ धावा केल्या होत्या, ठाकूरने भारताच्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांच्याविरुद्ध मोठे फटके लगावले.
संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या दिवशीच संघातील अंतर्गत चार दिवसीय सामना संपवला हा सामना सोमवारपर्यंत (दि. १६) चालणार होता. यात भारत ‘अ’चे खेळाडू भारतीय संघावर वरचढ झाल्याचे दिसून आले. बीसीसीआयने रविवारी (दि. १५) टीम इंडियाच्या अंतर्गत संघातील सामना संपल्याचे जाहीर केले. , भारताने ४६९ धावा केल्यानंतर भारत ‘अ’ने त्याला तोडीस तोड उत्तर दिले. मंगळवारी (दि. १७) भारतीय संघ पहिल्या कसोटीसाठी लीड्सला रवाना होईल.
२०२३ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणारा शार्दुल ठाकूर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारताच्या संघाचा भाग नव्हता, तर नितीश कुमार रेड्डी पाचही कसोटी सामने खेळला. त्याने मेलबर्न कसोटीत शतकही ठोकले. शार्दुल महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्यासाठी ओळखला जातो.
भारतासाठी ११ कसोटी सामने खेळणाऱ्या शार्दुलने ३१ विकेट्स घेतल्या आहेत, तर १८ डावांमध्ये ६७ या सर्वोच्च धावसंख्येसह ३३१ धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा १८ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला. डिसेंबर २०२३ मध्ये सेंचुरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो शेवटची कसोटी खेळला होता. वृत्तसंंस्था
नितीशकुमारऐवजी शार्दूलला संधी मिळण्याची शक्यता
सामन्यादरम्यान मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बेकेनहॅममध्ये सर्फराझ आणि शार्दुलचे शतक पाहिले. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर, ठाकूर १० चेंडूत ४ चौकारांसह १९ धावांवर नाबाद होता. सराव सामन्यात शार्दुलच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्या कसोटीसाठी त्याला सहकारी अष्टपैलू नितीशकुमार रेड्डीपेक्षा पसंती मिळण्याची शक्यता आहे.
सामन्याचे थेट प्रेक्षपण नाही...
सराव सामना थेट प्रक्षेपित करण्यात आला नव्हता आणि त्याचे निकाल अधिकृतपणे माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. माध्यमांच्या वृत्तानुसार, तीन किंवा चार दिवसांचा सामना खेळण्याचा निर्णय संघाचा होता. संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या दिवशीच संघातील अंतर्गत सामना संपवला. सोमवारी (दि. १६) सर्व खेळाडूंनी विश्रांती घेतली.