मनूने रचला इतिहास

भारताची गुणवान नेमबाज मनू भाकर हिने मंगळवारी (दि. ३०) इतिहास रचला. तिने सरबज्योत सिंगसह १० मीटर पिस्टल मिश्र प्रकारातही कांस्यपदक जिंकले. यापूर्वी १० मीटर पिस्टलमध्येच वैयक्तिक प्रकारातही तिने कांस्यपदक जिंकले होते. यासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरण्याचा ऐतिहासिक पराक्रम मनूने केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 31 Jul 2024
  • 03:36 pm
sport news, Manu Bhakar, Sarabjot Singh, bronze medal, Olympics, independent India

संग्रहित छायाचित्र

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू, सरबज्योतसह १० मीटर पिस्टल मिश्र प्रकारातही जिंकले कांस्यपदक, यापूर्वी जिंकले वैयक्तिक पदक

पॅरिस: भारताची गुणवान नेमबाज मनू भाकर हिने मंगळवारी (दि. ३०) इतिहास रचला. तिने सरबज्योत सिंगसह १० मीटर पिस्टल मिश्र प्रकारातही कांस्यपदक जिंकले. यापूर्वी १० मीटर पिस्टलमध्येच वैयक्तिक प्रकारातही तिने कांस्यपदक जिंकले होते. यासह एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली खेळाडू ठरण्याचा ऐतिहासिक पराक्रम मनूने केला.

मनू आणि सरबज्योत यांची जोडी सोमवारीच १० मीटर पिस्टल मिश्र प्रकारामध्ये पदकाच्या शर्यतीत पोहोचली होती. यापूर्वी तिने वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई केलेली असल्याने १४० कोटी भारतीयांच्या नजरा मंगळवारी मनू काय कामगिरी करते, याकडे लागून होत्या. या २२ वर्षीय ‘शार्प शूटर’ने देशवासियांच्या अपेक्षांची पूर्तता करताना सरबज्योतसह कांस्यपदक जिंकले. या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर आतापर्यंत दोन कांस्यपदके जमा झाली आहेत. ही दोन्ही पदके मनूनेच पटकावली आहेत. यापूर्वी मल्ल सुशीलकुमार आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. 

कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात मनू-सरबज्योत या भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांना १६-१० अशा फरकाने धूळ चारली. या सामन्यात भारतीय जोडीने पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटपासून मनू-सरबज्योत जोडीने आघाडी मिळवली. पाचवा सेट कोरियाने जिंकला. मात्र यामुळे सामन्याचा निकाल बदलू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झालीनाही. सबरज्योत तीन वेळा मागे पडला होता. मात्र मनूने त्याची कसर भरून काढताना शानदार नेम साधून कोरियन जोडी आघाडी घेणार नाही, याची काळजी घेतली.  

 मनू- सरबज्योत जोडीने पात्रता फेरीत ५८० गुण मिळवत कांस्य पदकासाठीच्या सामन्यात स्थान निर्माण केलं होतं. या सामन्यात कोरियाने चांगली सुरुवात केली होती.  पहिल्या फेरीत कोरियन संघाने २०.५ तर भारतीय संघाने १८.८ गुण मिळवले होते. मात्र त्यानंतर मनू-सरबज्योत जोडीने निग्रहपूर्वक संयमी खेळ केला. दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीने २१.२ तर कोरियाने १९.९ गुण मिळवले.

 तिसऱ्या फेरीतही भारतीय जोडीने वर्चस्व राखले. मनू-सरबज्योत जोडीने २०.८ तर कोरियन संघाने १९.८ गुण मिळवले. पाचव्या फेरीत कोरियन जोडीने यश मिळवले. मात्र तोवर भारतीय संघाचे मोठी आघाडी घेतली होती. सहावी फेरी जिंकून भारतीय संघाने कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. 

मनूला तिसरे पदकही जिंकण्याची संधी
मनू भाकर ही हरियाणातील झज्जरची रहिवासी आहे. २२ वर्षीय मनूने राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. शाळेच्या काळात तिने बॉक्सिंग आणि कराटेसह अर्धा डझन खेळ खेळले आहेत. मनू  कारकिर्दीतील दुसरे ऑलिम्पिक खेळत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये  बंदुकीमध्ये बिघाड झाल्याने ती अपयशी ठरली होती. यावेळी मनूला तिसरे पदक जिंकण्याचीही संधी आहे. २ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारातही ती सहभागी होत आहे.  

कोण आहे सरबज्योत?
सरबज्योत सिंग हा हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील धेन गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील जतिंदर सिंग हे शेतकरी आहेत. त्याने डीएव्ही कॉलेज चंदीगडमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तो सुरुवातीला फुटबॉल खेळायचा. सरबज्योतचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. १० मीटर पिस्तुल पुरुष प्रकारात थोड्या फरकाने पदक हुकले होते. सरबजोतने वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप आणि एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

१२ वर्षांनंतर नेमबाजीत दोन पदके
भारताला  १२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन पदके मिळाली आहेत. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदक जिंकले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story