Neeraj Chopra Marriage : कोण आहे हिमानी मोर..? जिच्यासोबत ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने बांधली आहे लग्नगाठ....

भारताचा गोल्डन बाॅय आणि मोस्ट इलिजिबल बॅचलर नीरज चोप्रा टेनिसपटू हिमानी मोर हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. १६ जानेवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडला.

Neeraj Chopra’s wife...

Neeraj Chopra’s wife Himani Mor

पानीपत | भारताचा गोल्डन बाॅय आणि मोस्ट इलिजिबल बॅचलर नीरज चोप्रा टेनिसपटू हिमानी मोर हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. सलग ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या २७ वर्षीय नीरजने सोलन येथील लक्झरी रिसॉर्ट सूर्यविलास येथे सोनीपतची टेनिसपटू २५ वर्षीय हिमानी मोरसोबत लग्न केले. १६ जानेवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी हॉटेलमधील गोपनीयता लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे टेपने बंद करण्यात आले. याशिवाय लग्नाच्या विधींची नोंद कोणी करू नये, म्हणून पाहुण्यांसह हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे फोनही तीन दिवस बंद होते.

हे रिसॉर्ट सोलनच्या कुमारहट्टीला लागून असलेल्या गांधीग्राममध्ये आहे. ते शिमल्यापासून सुमारे ६५ किलोमीटर आणि चंदीगडपासून सुमारे ६२ किलोमीटर अंतरावर आहे. हॉटेलच्या माहितीनुसार, सर्व पाहुणे १५ जानेवारीला दुपारी आले होते. नीरजने रविवारी (दि. १९) रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची माहिती दिली होती.

नीरजने लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी एक अटदेखील ठेवली होती की कुठेही फोटो-व्हीडीओ रिलीज करण्यात येऊ नये. हिमाचल प्रदेशातील सोलन येथील रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर नीरज पत्नी हिमानीसोबत सोनीपतला गेला आणि तिथून दोघेही अमेरिकेला रवाना झाले.

नीरजचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी सांगितले की, ‘‘लग्नाला फक्त मुलगा आणि मुलीचे कुटुंबीयच उपस्थित होते. गावात किंवा नातेवाइकांनाही या लग्नाची माहिती देण्यात आली नाही. दोघांनी १६ जानेवारीला सप्तपदी घेत एकमेकांसोबत जीवनभराची सोबत केली.’’ नीरजची वधू हिमानीची आई मीना यांनी सांगितले की, लग्नासाठी फक्त कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. दोन्ही कुटुंबे सात-आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यापूर्वी  सर्व परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत परतणे आवश्यक होते. यामुळे हिमानी लग्न आटोपल्यावर अमेरिकेत परतली.

मीना मोर पुढे म्हणाल्या, ‘‘लग्न गुपचूप नाही तर अल्प सूचनेवर झाले होते. नीरजची मे महिन्यात चॅम्पियनशिप आहे. हिमानी अभ्यासासोबत नोकरीही करते. हे लक्षात घेऊन वेळ अशी ठेवण्यात आली होती. गेल्या सात-आठ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. कौटुंबिक भेटीही झाल्या. आता नीरज-हिमानीला वेळ मिळताच रिसेप्शन होणार आहे. हिमानी अमेरिकेत राहणार आहे. नीरज प्रशिक्षणासाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे.’’

नीरजच्या कुटुंबासोबत आधीपासून मित्रत्वाचे संबंध असल्याने सांगत हिमानीचा भाऊ हिमांशू म्हणाला, माझ्या वडिलांची नीरजचे काका सुरेंद्र चोप्रा यांच्याशी मैत्री आहे. एकमेकांच्या घरी जावे लागते. नीरज आणि हिमानी एकमेकांना आधीच ओळखत होते. दोघेही खेळाशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत दोघांमध्ये चांगले बॉंडिंग होते. हिमानी ही राष्ट्रीय टेनिसपटू राहिली आहे. नीरज आणि हिमानी यांच्यातील चांगले बॉंडिंग पाहून दोन्ही कुटुंबांनी कौटुंबिक मैत्रीचे नात्यात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. लग्नात दोन्ही कुटुंबातील ४०-५० जण उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी कोणालाच मोबाईल जवळ बाळगण्याची परवानगी नव्हती. नीरजच्या विनंतीचा मान ठेवत सर्वांनी ही बाब आनंदाने मान्य केली, याचे आम्हाला समाधान आहे.’’

नीरज लष्करात  राजपुताना रायफल्समध्ये ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) म्हणून तैनात झाला. नंतर त्याला नायब सुभेदार पद देण्यात आले. २०१६ मध्ये औपचारिकपणे त्याला जेसीओ म्हणून लष्करात सामील करून घेण्यात आले.

नीरजची पोस्ट....

नीरजने रविवारी रात्री ‘एक्स’वर लग्नाचे तीन फोटो जारी केले होते. यासोबत लिहिले होते, ‘‘माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला.’’ नीरजने फोटो शेअर केल्यानंतरच सर्वांना लग्नाची माहिती मिळाली. नीरजच्या पोस्टनंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी रात्रीच पानिपतमधील खंडरा गावात त्याच्या घरी पोहोचून आपल्या लाडक्या खेळाडूचे आणि कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

 कोण आहे हिमानी मोर?

२५ वर्षीय हिमानी सध्या अमेरिकेत शिकत आहे. हिमानीची आई मीना आणि वडील चांद यांनी आपल्या मुलीला खेळात पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिला टेनिस स्टार बनवण्यासाठी आई मीना यांनी लाडसौली गावातील घर सोडले आणि सोनीपत शहरात भाड्याच्या घरात राहिल्या. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, हिमानीच्या पालकांनी त्यांच्या मुलीला प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक प्रशिक्षक नियुक्त केला. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघातर्फे आयोजित मोठ्या स्तरावरील स्पर्धेसाठी प्रशिक्षण देऊ शकेल, अशा प्रशिक्षकाची तिला गरज होती. आई मीना यांनीच ही भूमिका बजावली. हिमानीने युरोपियन सर्किटमध्ये आशियाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय क्षण असल्याचे तिने सांगितले होते.  

नीरजने रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लग्नाचा फोटो शेअर केला. काही मिनिटांतच तो गुगल ट्रेंडिंगमध्ये टॉपवर आला. सर्वजण नीरजच्या बायकोचा शोध घेऊ लागले. या काळात ‘हिमानी कोण आहे,’ हा गुगलवर सर्वात जास्त सर्च केला जाणारा प्रश्न ठरला. याशिवाय गुगलवर ‘हिमानी मोर - टेनिस प्लेयर,’ ‘हिमानी चोप्रा,’ ‘नीरज चोप्रा विवाह,’ ‘नीरज चोप्राची पत्नी कोण आहे,’ हे सर्च जोरात होते.  

पाच महिन्यांपूर्वीच मिळाले लग्नाचे संकेत

 नीरज आणि हिमानीच्या लग्नाचे संकेत पाच महिन्यांपूर्वी मिळाले होते. ‘रेडिट’ नावाच्या वेबसाइटवर एका यूजरने याबाबत दावा केला होता. त्याने म्हटले होते, ‘‘हरियाणातील स्पोर्ट्सशी संबंधित लोकांच्या नेटवर्कमध्ये एक बातमी येत आहे की नीरज चोप्रा आणि हिमानी मोर लग्न करणार आहेत.’’ साहजिकच या यूझरवर ‘‘हिमानी कोण आहे,’’ या प्रश्नाची सरबत्ती करण्यात आली. यावर त्याने सांगितले, ‘‘हिमानी ही टेनिस कोच मीना मोर यांची मुलगी आहे. त्या क्रीडा क्षेत्रातील एक लोकप्रिय चेहरा आहेत. हिमानी ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही आहे. ती अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहे. हे त्याने त्याच्या टेनिस क्लबमध्ये ऐकले.’’

Share this story

Latest