संग्रहित छायाचित्र
अष्टपैलू हार्दिक पंड्याने मंगळवारी (दि. १६) अनपेक्षितपणे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली. यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
हार्दिकने श्रीलंका दौऱ्यावर टी-२० मालिका खेळण्यास सहमती दर्शवली आहे, परंतु त्याने एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. वैयक्तिक कारणांमुळे एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याचे त्याने बीसीसीआयला सांगितले.
भारतीय संघ येत्या काही दिवसांत श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. उभय देशांमध्ये प्रथम तीन टी-२० आणि नंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याची मोठी बातमी आहे. पण तो फक्त टी-२० मालिकेत संघाचे प्रतिनिधित्व करणार असून वनडे मालिकेतून त्याने माघार घेतली आहे. याबाबत त्याने बीसीसीआय कळवले आहे.
भारताच्या टी-२० विश्वविजेतेपदात हार्दिकने मोठे योगदान दिले. वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिकसह सर्व वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेत आहेत. मात्र, नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना वनडे मालिकेसाठी वरिष्ठांनी परत यावे, असे वाटत असल्याचे वृत्त आहे. विराट कोहली लंडनमध्ये आहे तर दुसरीकडे वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्मा इंग्लंडनंतर अमेरिकेत आहे. यामुळे त्यांच्याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ अद्याप निवडण्यात आलेला नाही.
हार्दिकचा फिटनेस हा मोठा मुद्दा आहे, पण भारताचा आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, वनडे मालिकेत सहभागी न होण्याचे खरे कारण हार्दिक पंड्याच सांगू शकतो. अलीकडेच तो अनंत अंबानीच्या लग्नात जोमाने डान्स करताना दिसला होता. अनन्या पांडे आणि रणवीर सिंगसह त्याने खूप डान्स केला होता, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
असा आहे भारताचा श्रीलंका दौरा
टी-२० मालिका
पहिला सामना २७ जुलै, संध्या. ७ वाजता पल्लेकेले स्टेडियम
दुसरा सामना २८ जुलै, संध्या. ७ वाजता पल्लेकेले स्टेडियम
तिसरा सामना ३० जुलै, संध्या. ७ वाजता पल्लेकेले स्टेडियम
एकदिवसीय मालिका
पहिला सामना २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता कोलंबो
दुसरा सामना ४ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता कोलंबो
तिसरा सामना ७ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता कोलंबो