संग्रहित छायाचित्र
रोहित शर्माने टी-२० प्रकारातून निवृत्ती पत्करल्यानंतर हार्दिक पंड्या या प्रकारात भारतीय संघाचा कर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. पण बीसीसीआय आणि निवड समिती हार्दिकला कर्णधार करण्याच्या बाजूने नसून त्यांना ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्याची इच्छा असल्याचे कळते.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहितने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद कोण भूषवणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. हार्दिकने यापूर्वी भारताचे नेतृत्व केले असल्याने तसेच आयपीएलमध्ये त्याने गुजरात टायटन्स आणि यंदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सांभाळले असल्याने रोहितचा पर्याय म्हणून सुरुवातीला त्याच्याच नावाची चर्चा होती. आता मात्र, बीसीसीआय हार्दिककडे ही जबाबदारी सोपवण्याबाबत अनुत्सुक असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर या जबाबदारीसाठी बीसीसीआय आणि निवड समितीची पसंती टी-२० स्पेशालिस्ट आक्रमक फलंदाज सूर्या असल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत बीसीसीआय किंवा निवड समितीकडून अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पंड्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हार्दिकने रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे बीसीसीआय हार्दिकलाच भारताच्या टी-२० संघाचे कर्णधार घोषित करेल असे समजले जात आहे. पण याचदरम्यान आता एका अहवालात समोर आले आहे की बीसीसीआय हार्दिक पंड्याकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यावर साशंक आहे, याचे कारणही समोर आले आहे.
बीसीसीआय आणि निवड समिती सदस्य सध्या हार्दिकला त्याच्या फिटनेसच्या समस्येमुळे कायमस्वरूपी टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यावरून चिंतेत आहे. हा निर्णय घेताना दोन गट पडले असून त्यांच्यात या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारताच्या विजयात हार्दिकची महत्त्वाची भूमिका होती. पण त्याच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील त्याच्या गंभीर दुखापतींच्या इतिहासामुळे तो कर्णधार म्हणून संघाची धुरा कितपत सांभाळेल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हार्दिक त्याच्या फिटनेसमुळे कसोटी संघात स्थान कायम राखू शकलेला नाही. जानेवारी २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला प्रारंभ केल्यापासून आतापर्यंत म्हणजे सुमारे साडेसात वर्षांच्या कालावधीत केवळ ११ कसोटी सामने खेळला आहे.
हार्दिक यापूर्वी अनेकदा दुखापतींमुळे भारताच्या महत्त्वाच्या मालिकांमधून बाहेर झाला आहे. याच कारणांमुळे बीसीसीआय कर्णधारपदाची धुरा पूर्णपणे त्याच्यावर सोपवण्यात कचरत आहे. बीसीसीआयच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘हे एक नाजूक प्रकरण आहे. दोन्ही बाजूंकडून या विषयावर चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे सर्वजण एकमताने निर्णय घेऊ शकत नाहीत. हार्दिकचा फिटनेस हा एक मुद्दा आहे पण त्याने भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात मोठी भूमिका बजावली आहे.’’ वृत्तसंंस्था
सूर्याबाबत भारतीय खेळाडू सकारात्मक...
हार्दिकवरून सुरू असलेल्या या सर्व चर्चांदरम्यान सूर्यकुमार हा भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर टी-२० मध्ये भारताचा अव्वल फलंदाज असलेल्या यादवने एकदिवसीय विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत आपले नेतृत्व कौशल्य दाखवले होते.
“सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचं तर त्याच्या नेतृत्वाला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टी-२० कर्णधारपदाचा अंतिम निर्णय नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी विचारविनिमय करून केला जाईल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करताना गंभीरने सूर्यकुमारसोबत काम केले आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय आणि निवड समिती या आठवड्यात गंभीरसोबत पहिली निवड बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लवकरच श्रीलंकेतील आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघांची घोषणा केली जाईल,’’ अशी माहिती बीसीसीआयच्या या उच्च अधिकाऱ्याने दिली.