वेगवान गोलंदाज प्रभावी
लंडन जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियावर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले.
नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने कांगारूंना फलंदाजीसाठी पाचारण केले. वेगवान गोलंदाजीला पोषक असलेल्या वातावरणाचा आणि खेळपट्टीचा लाभ भारतीयांनी उचलला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कांगारूंचे आघाडीचे तीन फलंदाज पहिल्याच सत्रात ७६ धावांवर बाद करून प्रतिस्पर्ध्यांना दणका दिला. भारतातर्फे मोहद्दम सिराज, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३५ षटकांत ३ बाद १२० धावा केल्या होत्या. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ १५ तर ट्रॅव्हीस हेड ३१ धावांवर खेळत होते.
या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज घेऊन उतरला आहे. रवींद्र जडेजाला फिरकीपटू म्हणून संधी देण्यात आली, तर अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला बाहेर बसवण्यात आले. कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बालासोर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या हातावर पट्टी बांधून सामना खेळण्यासाठी बाहेर पडले.
शमी आणि सिराज यांनी आपापले पहिले षटक निर्धाव टाकून चांगला प्रारंभ केला. पहिल्या षटकात चाचपडत खेळणाऱ्या उस्मान ख्वाजाची कमजोरी सिराजने बरोबर हेरली आणि आपल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याची शिकार केली. सिराजने वॉबल सीम बॉल टाकला. ख्वाजाला हा चेंडू समजू शकला नाही आणि त्याच्या बॅटची किनार घेऊन चेंडू यष्टीरक्षक केएस भरतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. ख्वाजाला भोपळाही फोडता आला नाही.
ख्वाजाने निराशा केल्यानंतर दुसरा सलामीवीर डेव्हीड वाॅर्नर आणि सध्या ऑस्ट्रेलियाचा कसोटीतील अव्वल फलंदाज असलेला मार्नस लाबुशेन यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची उपयुक्त भागिदारी केली. यादरम्यान वाॅर्नरने कोणताही दबाव न घेता फलंदाजी केली. अर्धशतकाला ७ धावा कमी असताना शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक भरतने आपल्या उजवीकडे झेपावत त्याचा अप्रतिम झेल टिपला. वाॅर्नरने ६० चेंडूंत ८ चौकारांसह ४३ धावा केल्या.
डावखुरा वाॅर्नर परतल्यानंतर लाबुशेनने स्थिरावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फार काळ टिकला नाही. मोहम्मद शमीने त्याचा काटा काढला. शमीला ड्राईव्हचा फटका मारण्याच्या नादात लाबुशेनचा ऑफ स्टंप उडाला. २८ वर्षीय लाबुशेनने ६२ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांसह २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने २४.१ षटकांत ७६ धावांमध्ये आघाडीच्या तीन फलंदाजांना गमावले. त्यानंतर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हीस हेड यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ४४ धावाची भागिदारी करीत पडझड रोखली. या दोघांत हेड जास्त आक्रमक होता. त्याने २४ चेंडूंत नाबाद ३१ धावा करताना ६ चौकार लगावले. स्मिथ ५५ चोंडूंत एका चौकारासह १५ धावा करून त्याला साथ देत होता.
वृत्तसंस्था
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ३५ षटकांत ३ बाद १२० (डेव्हीड वाॅर्नर ४३, मार्नस लाबुशेन २६, उस्मान ख्वाजा ०, ट्रॅव्हीस हेड खेळत आहे ३१, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे १५, शार्दुल ठाकूर ७-१-२०-१, मोहम्मद शमी १०-१-३०-१, मोहम्मद सिराज १२-३-४०-१).