सामन्याची तिकिटे ब्लॅक होत असल्याचा चाहत्यांचा आरोप, बीसीसीआय आणि एमसीएला प्रेक्षकांचा सवाल
तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यामध्ये क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेटचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. असे असले तरी क्रिकेट चाहत्यांमध्ये मात्र नाराजी असून ऑनलाईन तिकीट मिळत नसल्याने अनेक क्रिकेट चाहते गहुंजे क्रिकेट स्टेडियम परिसरात गर्दी करत आहेत.
तिकीट मिळेल या आशेने चाहते स्टेडियम परिसरात दाखल होत असले तरी तिकीट हे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच उपलब्ध होणार आहे. नाराज क्रिकेटच्या चाहत्यांनी क्रिकेट सामन्यांची तिकिटे ब्लॅक होत असल्याचा आरोप करत थेट बीसीसीआय आणि एमसीएला प्रश्न विचारला आहे.
पुण्यातील एमसीए क्रिकेट मैदानावर विश्वचषकाचे पाच सामने खेळवले जाणार आहेत. पहिला क्रिकेटचा सामना हा भारत विरुद्ध बांगलादेश असा रंगणार आहे. त्यानंतर इतर देशांचे सामने खेळवले जातील. भारत विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट सामन्याचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने न मिळाल्यामुळे अनेक क्रिकेट चाहते नाराज आहेत. ते स्टेडियम परिसरात हजेरी लावत आहेत. तिकीट मिळते की नाही याची चौकशी करत आहेत. प्रत्यक्षात मात्र स्टेडियममध्ये तिकीट विक्री नाही. केवळ ऑनलाईन तिकीट विक्री करण्यात येते आहे. परंतु, या ठिकाणी अनेक क्रिकेटप्रेमीनी तिकिटांचा काळा बाजार होत असल्याचा आरोप केला आहे. याचा थेट फटका प्रेक्षकांना बसला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अवघ्या बाराशे रुपयांचं तिकीट हजारो रुपयांना विक्री करत असल्याचा आरोप क्रिकेट चाहत्यांनी केला आहे आणि याचा फटका चाहत्यांना बसत असून त्यांनी बीसीसीआय आणि एमसीएबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अवघ्या देशभरात विविध राज्यांतील मैदानांवर विश्वचषकाचे क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. परंतु, म्हणावी तशी गर्दी क्रिकेट स्टेडियममध्ये होत नाही. असा दाखला देत तिकिटासंदर्भात गलथान कारभार झाल्यानेच स्टेडियममध्ये गर्दी होत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
पुणे येथील गहुंजे मैदान येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ चे पाच सामने होणार आहेत. त्या सामन्यांचे वेळापत्रकदेखील जाहीर झाले आहे. त्यानुसार पीएमपीकडून क्रिकेट शौकिनांना गहुजे मैदान येथे येण्या-जाण्याच्या सोयीसाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, क्रिकेट शौकिनांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकांवरून जादा बसचे नियोजन करण्यात येईल. मनपा व निगडी बायपास येथून प्रतिव्यक्ती १०० रुपये तिकीट दर असणार आहे. क्रिकेट सामने संपल्यानंतर परत येण्यासाठी तेथून बस असणार आहेत.
गहुंजे मैदानावरील पाचपैकी चार सामने हे डे-नाईट होणार आहेत. १९, ३० ऑक्टोबर, एक आणि आठ नोव्हेंबर या तारखेला हे सामने असणार आहेत. त्या दिवशी पुणे मनपा भवन येथील सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेला बस सुटतील, तर, कात्रज बायपास येथून सकाळी ११ आणि साडेअकरा वाजता बस सुटेल, तर निगडी टिळक चौकातून दुपारी ११२ आणि साडेबारा वाजता बस सुटणार आहे.
गहुंजे येथे क्रिकेट विश्वचषकातील होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दिवशी मनपा भवन, कात्रज बायपास आणि निगडी टिळक चौक येथून या बस सोडल्या जाणार आहेत.
एमसीए मैदानावर कोणते सामने होणार?
भारत विरुद्ध बांगलादेश............... . १९ ऑक्टोबर
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका.... .३० ऑक्टोबर
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका…..०१ नोव्हेंबर
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स……….०८ नोव्हेंबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश…… ११ नोव्हेंबर