संग्रहित छायाचित्र
कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीवर मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि टीम स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहीनने वर्ल्ड कप आणि आयर्लंड दौऱ्यात गॅरी, सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूद आणि टीम स्टाफसोबत गैरवर्तन केले.
प्रशिक्षक आणि संघाच्या कर्मचाऱ्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे तक्रार केली आहे. आता या घटनेच्या वेळी संघ व्यवस्थापनाने शाहीनवर कारवाई का केली नाही याची चौकशी केली जाईल.
पाकिस्तानच्या ‘समा न्यूज’ने सांगितले की, शाहीनच्या वर्तनानंतरही निवड समिती सदस्य आणि वरिष्ठ व्यवस्थापक वहाब रियाझ आणि मन्सूर राणा यांनी त्याला पाठिंबा दिला. काही खेळाडू लॉबिंग करत असल्याचा आरोप संघाच्या कर्मचाऱ्यांनी केला. वहाब रियाझ आणि मन्सूर राणा यांना पीसीबीने हटवले आहे. याशिवाय निवड समितीचा भाग असलेला माजी अष्टपैलू अब्दुल रझाक यालाही हटवण्यात आले आहे.
प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी विश्वचषकानंतर सांगितले होते की, संघात एकता नाही आणि संघ दुफळीत विभागला गेला आहे. गॅरीच्या कोचिंगमध्ये भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या आयपीएलनंतर गॅरी कर्स्टन यांना पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले.
शाहीनला टी-२० विश्वचषकापूर्वी टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते, ज्यामुळे तो पीसीबीवर नाराज होता. २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. यानंतर बाबर आझमने कर्णधारपद सोडले आणि शाहीनला कर्णधार बनवण्यात आले होते. आता पुन्हा बाबरला कर्णधार नेमण्यात आले आहे.