बाबा तुमची आठवण येते...
#मुंबई
मैदानावर खेळताना सहसा भावना व्यक्त न करणाऱ्या खेळाडूंत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा समावेश होतो. निवृत्त झाल्यानंतर ‘वर्ल्ड फादर्स डे’ च्या निमित्ताने सचिनने वडिलांबद्दल भावनिक पोस्ट लिहिली आहे.
टीम इंडिया १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषकात खेळत असताना झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सचिनच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर २३ मे १९९९ या दिवशी झिम्बाब्वेविरुद्ध शतक ठोकल्यानंतर पहिल्यांदा सचिनने आकाशाकडे बघत वडिलांना श्रद्धांजली वाहिली. हा क्षण सचिनसह त्याच्या फॅन्ससाठी खूप भावुक क्षण होता. रविवारी फादर्स डे च्या निमित्ताने मास्टर-ब्लास्टर सचिनने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
सचिनने भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं, असं सचिनच्या वडिलांचं स्वप्न होतं. सचिन नेहमी त्याच्या वडिलांच्या तत्त्वांवर चालत आला आहे. अलीकडे तो अनेकदा वडिलांच्या आठवणी शेअर करत असतो. अशातच ‘फादर्स डे’ ला सचिनने वडिलांचा फोटो शेअर केला आहे.
काय म्हणाला सचिन?
माझे वडील कडक नव्हते, ते खूप प्रेमळ होते. घाबरण्याऐवजी त्यांनी नेहमी प्रेमानं वागवलं. त्यांनी मला खूप काही शिकवलं... मला जगात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरित केलं. त्यांची विचारसरणी, मूल्ये आणि पालकत्वाच्या त्यांच्या कल्पना काळाच्या खूप पुढे होत्या. मला तुमची आठवण येते बाबा, असं म्हणत सचिनने वडिलांची आठवण जागवली आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक होते.