IPL 2025 (CSK vs RR, Match 62)
नवी दिल्ली - आयपीएल क्रिकेटमध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांच्यातील ९८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला. यासह, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाचा स्पर्धेतला प्रवास संपला. हा त्यांचा गट टप्प्यातील शेवटचा सामना होता. त्याच वेळी, चेन्नईला २५ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. राजस्थान आणि चेन्नई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानने १७.१ षटकांत चार गडी गमावून १८८ धावा केल्या आणि स्पर्धेतील त्यांचा चौथा विजय नोंदवला. चेन्नईचा हा १३ सामन्यातील दहावा पराभव होता. राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज आकाश मधवालला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
राजस्थानचा डाव...
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली जी अंशुल कंबोजने तोडली. त्याने जयस्वालला त्रिफळाचित केले. तो १९ चेंडूत (५ चौकार अन् २ षटकार) ३६ धावा करून बाद झाला. यानंतर, सूर्यवंशीला कर्णधार संजू सॅमसनची साथ मिळाली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. सॅमसन ४१ धावा करून बाद झाला आणि सूर्यवंशी ५७ धावा करून बाद झाला. सूर्यवंळीनं या खेळीत ४ षटकार अन् ४ चौकार लगावले. या सामन्यात रियान परागला चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो तीन धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेल ३१ आणि शिमरॉन हेटमायर १२ धावांवर नाबाद राहिले. चेन्नईकडून अश्विनने दोन तर अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
चेन्नईचा डाव...
तत्पूर्वी, चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. डेव्हॉन कॉनवेला युधवीर सिंगने बाद केले. तो फक्त १० धावा करू शकला. यानंतर, त्याने उर्विल पटेललाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, जो खातेही उघडू शकला नाही. चेन्नईकडून आयुष म्हात्रेने ४३, देवाल्ड ब्रेव्हिसने ४२ आणि शिवम दुबेने ३९ धावांची मोठी खेळी केली. त्याच वेळी, कर्णधार धोनी १७ चेंडूत १ षटकारासह १६ धावा काढून बाद झाला. राजस्थानकडून युद्धवीर सिंग आणि आकाश माधवाल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर तुषार देशपांडे आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.