सर्फराज आला रे !
हैदरबाद: इंग्लंडविरुद्ध २ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि फलंदाज के. एल. राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. त्यांच्याऐवजी रणजी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा सर्फराझ खान (Sarfraz Khan) तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभकुमार यांना संधी देण्यात आली आहे. (Sport News)
निवडकर्त्यांनी सर्फराझसह सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला २८ धावांनी अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यादरम्यान जडेजा आणि राहुल जखमी झाले होते. या तिघांपैकी कोणाची अंतिम संघात निवड होईल, याचा निर्णय सामन्यापूर्वी होणार आहे.
हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला.पायाचे स्कॅनिंग करून त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्याचवेळी केएल राहुलला मांडीत दुखत असल्याची तक्रार आहे. याच कारणामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या थेट फटक्याने रवींद्र जडेजा धावबाद झाला. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याला चालताना त्रास झाला. सामना संपल्यानंतर हैदराबादमध्येच जडेजाच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले.
जडेजाच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला सौरभ हा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाजही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या सौरभने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९० विकेट घेण्यासोबतच २,०६१ धावाही केल्या आहेत. सौरभ कुमारने नुकत्याच इंग्लंड अ संघाविरुद्ध पहिल्या डावात ७७ धावा केल्या आणि सामन्यात ६ बळी घेतले.
वॉशिंग्टन सुंदरने यापूर्वी टीम इंडियासाठी कसोटी सामनेही खेळले आहेत. ऑफस्पिनर असलेल्या अष्टपैलू सुंदरने आतापर्यंत ४ कसोटी सामन्यात ६ विकेट घेतल्या असून २६५ धावा केल्या आहेत.
आता तरी संधी मिळणार?
मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या सर्फराझ खानने आतापर्यंत ४५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या २६ वर्षीय सर्फराझने ४५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सुमारे ६९.८५च्या सरासरीने ३,९१२ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये १४ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला यापूर्वी संधी मिळाली नाही म्हणून अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर टीका केली होती. त्यामुळे आता तरी सर्फराझला संधी मिळणार की नाही, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.