लखनौ सुपर जायंट्स संघात शेडगेला संधी
#मुंबई
लखनौ सुपर जायंट्सचा सर्वोत्तम गोलंदाज जयदेव उनाडकट दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघाने युवा खेळाडू सूर्यांश शेडगेला संधी दिली आहे. सूर्यांशने अंडर-१९ क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. लखनौ संघातील खेळाडूंच्या दुखापतीमुळे केएल राहुलचा संघ अडचणीत आला आहे. दुखापतीमुळे राहुलही संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत कुणाल पांड्या संघाची धुरा सांभाळत आहे.
आयपीएलने ट्विट करून सूर्यांश लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाल्याची माहिती शेअर केली आहे. दुखापतग्रस्त जयदेव उनाडकटच्या जागी सूर्यांश शेडगेचा संघात समावेश करण्यात आल्याचे स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. उनाडकट खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. सरावादरम्यान तो खांद्यावर पडला होता. यामुळे तो जखमी झाला होता. त्याच्या जागी सूर्यांशला २० लाख रुपये देऊन संघात स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान लखनौ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मोसमात लखनौने १३ सामने खेळले आहेत. या दरम्यान संघाने सात सामने जिंकले, तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि एक सामना अनिर्णीत राहिला. लखनौ आणि चेन्नईचे गुण समान आहेत, पण चेन्नईचा नेट रन रेट खूपच चांगला आहे. चेन्नई आणि लखनौचे १५-१५ गुण आहेत. लखनौचा शेवटचा साखळी सामना कोलकात्याशी होणार आहे. हा सामना २० मे रोजी होणार आहे. पात्रता फेरी गाठण्यासाठी संघाला कोणत्याही परिस्थितीत या सामन्यात विजय मिळवावा लागेल. लखनाैने गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवले आहेत. त्यानी हैदराबाद आणि मुंबईचा पराभव केला आहे.
कोण आहे सूर्यांश शेडगे?
सूर्यांश शेडगे हा युवा फलंदाज असून तो मुंबईकडून खेळतो. त्याला लखनौ सुपर जायंट्स संघाने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. सूर्यांश जाईल्स शील्ड स्पर्धेत सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. गुंदेचा एज्युकेशन अकादमीसाठी (कांदिवली) त्याने सात वर्षांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुंबादेवी निकेतन (बोरिवली) विरुद्ध या स्पर्धेत १३७ चेंडूत ३२६ धावा केल्या होत्या.