Belgaon | देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

मराठा लाईट इन्फंट्रीला २५६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मराठा दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बेळगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Wed, 5 Feb 2025
  • 12:50 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार...

मुंबई : देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोजक्या सैनिकांसह प्रकाशाच्या वेगाने चपळता दाखवून मराठा लाईट इन्फंट्रीने अतुलनीय पराक्रम गाजवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केला, त्या प्रित्यर्थ मराठा लाईट इन्फंट्री ४ फेब्रुवारी हा दिवस “मराठा दिन” म्हणून साजरा करत आहे. ही सर्व महाराष्ट्रीयनांसाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी काढले.

मराठा लाईट इन्फंट्रीला २५६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मराठा दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बेळगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस व्यासपीठावर माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आमदार श्रीमती जोल्ले, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, पोस्ट विभागाच्या संचालक व्ही. तारा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच यावर्षी बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री च्या “मराठा दिन” या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

मराठा लाईट इन्फंट्री ही देशाचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक  करून, देशात व देशाबाहेर मोठा पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी मत व्यक्त केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांनी असीम पराक्रम करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला होता. या घटनेचे स्मरण म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण यावेळेस करण्यात आले. यावेळेस नरवीर  तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम उलगडवून दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले.

Share this story

Latest