बीसीसीआयला हवे आहे आयपीएलपेक्षा मोठे घबाड
#नवी दिल्ली
बीसीसीआय भारताच्या सामन्यांचे प्रसारण हक्क विकण्यासाठीच्या निविदा (टेंडर) काढण्यात उशीर करत आहे. बीसीसीआय हे झी आणि सोनीच्या विलीनीकरणासाठी थांबले असल्याची माहिती समोर येत होती. मात्र बीसीसीआय सध्या प्रसारण हक्क विक्रीच्या टेंडर न काढण्यामागे आयपीएलचा यंदाचा हंगाम असल्याचे कळते.
ब्रॉडकास्टर्समध्ये बेस प्राईसवरून भीतीचे वातावरण आहे. कारण बीसीसीआय टीम इंडियाच्या सामन्यांसाठी आयपीएल सामन्यापेक्षाही जास्त बेस प्राईसला प्रक्षेपण हक्क विक्री करण्यास इच्छुक आहे. आयपीएलच्या एका सामन्याचे मूल्य हे ११८ कोटी इतके होते. बीसीसीआयने सबुरीची रणनीती अवलंबली आहे. ते झी आणि सोनीच्या विलीनीकरणासाठी थांबले आहेत. त्यानंतर ते प्रक्षेपण हक्क विकण्याचे टेंडर काढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र परिस्थिती तशी नाही. वनडे आणि कसोटी क्रिकेट बघणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे ते पाहता भारतीय ब्रॉडकास्टरचा प्रत्येक सामन्याला भली मोठी रक्कम देण्यात रस नाही. सुरुवातीच्या मार्केटच्या मूल्यमापनात नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर बीसीसीआय आता आपल्या बेस प्राईसवर नव्याने काम करत आहे. ज्यावेळी ब्रॉडकास्टर्स आणि बीसीसीआय याबाबत सहमत असतील त्यावेळी टेंडर काढण्यात येईल.
गेल्या वेळच्या मीडिया राईट्स डीलनुसार भारतातील मायदेशातील सामन्याचे मूल्यांकन हे जवळपास ६० कोटीच्या आसपास होते. डिस्ने प्लस स्टारने पाच वर्षाच्या सायकलमधील १०३ सामन्यांसाठी ६१३८.१ कोटी रुपये दिले होते. बीसीसीआयला आयपीएलच्या ४१० सामन्यांसाठी मीडिया राईट्समधून ४८,३९० कोटी रुपये मिळाले होते. प्रतिसामना याची किंमत ११८ कोटी रुपयांपर्यंत पोहचली. जरी पाच वर्षांच्या सायकलमध्ये ३७० सामने असले तरी बीसीसीआयला सध्याच्या सायकलमध्ये ८४ ते ९४ सामने वाढवण्याबाबत विचार करावा लागणार आहे. बीसीसीआयला भारतीय सामन्याच्या बाबतीत १०० सामन्यांसाठी जवळपास १५ हजार कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. जर तसे झाले तर प्रतिसामना मीडिया राईट्सची किंमत ही १५० कोटी रुपयांपर्यंत जाईल.