कांगारूंकडून बॉल टेम्परिंग?
#लंडन
पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अली याने जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बाॅल टेम्परिंग अर्थात चेंडूशी नियमबाह्य छेडछाड केल्याचा खळबळजनक आरोप केला.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या अंतिम सामन्यादरम्यान बासित याने ऑस्ट्रेलियाच्या संघावर गंभीर आरोप केले आहेत. बासितच्या मते, ‘‘विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना ऑस्ट्रेलियाने हेराफेरी करून बाद केले.’’ पाकिस्तानसाठी १९ कसोटी आणि ५० एकदिवसीय सामने खेळलेल्या ५२ वर्षीय बासितने आपल्या यूट्यूब व्हीडीओवर ऑस्ट्रेलियाच्या संघावर हे आरोप केले आहेत.
कुठे झाली टेम्परिंग ?
बासित म्हणाला, ‘‘पहिल्या डावात भारतीय संघ फलंदाजी करीत असताना १६ ते १८ षटकात टेम्परिंग झाल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. १८ व्या षटकात पंच रिचर्ड कॅटलबोरो यांच्या सूचनेनंतर चेंडू बदलण्यात आला. तोपर्यंत चेंडू खराब झाला होता. १६, १७ आणि १८ वे षटक पाहिल्यास टेम्परिंग दिसून येईल. विराट कोहली बाद झाला त्या चेंडूची चमक पाहा. मैदानावर काय चालले, याबाबत कोणत्याही फलंदाजाला संशय आला नाही.’’
ऑस्ट्रेलियाच्या प्लॅनला कुणीही पाहू शकले नाही, हे पाहून आश्चर्य वाटले. समालोचक आणि पंचांनाही ही बाब दिसली नाही. तिसरे पंच असो अथवा मैदानावर असणाऱ्या भारतीय फलंदाजांनाही समजले नाही. कुणीच ऑस्ट्रेलियाची टॅक्टिक्स पकडली नाही, असा दावादेखील बासितने केला आहे.
रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा हे ज्या चेंडूवर बाद झाले, त्याबद्दलही बासितने शंका व्यक्त केली. ‘‘जडेजा चेंडू ऑनसाईडला फटकावणार होता, पण चेंडू पॉइंटकडे गेला. पंचांना काहीच दिसले नाही का? पुजाराच्या विकेटबाबतही असेच घडले. कॅमरून ग्रीनने पुजाराला टाकलेल्या चेंडूची चमक पुजाराच्या बाजूने होती मात्र चेंडू आत आला अन् तो क्लीन बोल्ड झाला. टेम्परिंग केल्याशिवाय चेंडू अशा रितीने आत येऊच शकत नाही. ऑस्ट्रेलियाने टेम्परिंग केले, हे स्पष्टपणे दिसते. बीसीसीआयला ही बाब समजली नाही का ? ड्यूक बॉल ४० षटकांपर्यंत रिव्हर्स स्विंग होत नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना आधीच कसा रिव्हर्स स्विंग मिळाला,’’ अशा अनेक प्रश्नांच्या फैरी बासितने झाडल्या.
लाबुशेनचा व्हीडीओ व्हायरल
बासित अलीच्या आरोपानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नस लाबुशेन याचा बॉल घासतानाचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. खरबडीत असणाऱ्या क्रॅप बॅंडने बॉल घासताना लाबुशेन दिसत आहे. ट्विटरवर हा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. क्रॅप बॅंडने चेंडू घासण्याची परवानगी आहे का, असा सवाल लाबुशेनच्या कृतीनंतर उपस्थित केला जात आहे.
वृत्तसंस्था