अश्विन की जडेजा, की दोघेही?
#लंडन
कसोटी क्रिकेट प्रकारातील दुसरा जगज्जेता ठरवणारी लढत काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भारतीय संघात फिरकी गोलंदाज म्हणून कोणाला संधी मिळणार, हे अद्याप निश्चित नाही. येत्या ७ तारखेपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ जाहीर होईल. मात्र, तत्पूर्वी फिरकी गोलंदाज म्हणून ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनला संधी मिळणार की डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला? की दोघांनाही खेळवण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापन घेणार, याबाबत
उत्सुकता आहे.
सध्या क्रिकेटविश्वातील तमाम चाहत्यांचे लक्ष जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम सामन्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाच्या अतिम संघनिवडीबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याचे कळते. मात्र, डेव्हिड वाॅर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियाच्या धोकादायक फलंदाजांविरुद्ध अश्विनने केलेली शानदार कामगिरी बघता त्याला संधी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे.
अश्विन आणि जडेजा हे दोघे प्रभावी गोलंदाजीबरोबरच उपयुक्त फलंदाजीदेखील करतात. याचा फायदा अनेकदा भारतीय संघाला झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम सामन्यात कोणाला संधी मिळणार, याबाबत भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये जोरदार चर्चा रंगलेली दिसून येते. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांविरुद्ध जोरदार रेकाॅर्ड असलेल्या अश्विनला संधी मिळणार की डावखुरा फिरकीपटू म्हणून जडेजाची निवड होणार? की दोघांनाही खेळवून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार, याचे उत्तर प्रत्यक्ष सामना सुरू होण्याच्या काही तास आधी मिळणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसले. आता ते कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळतील. या महत्त्वाच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला एकीकडे दुखापतींचं ग्रहण लागलं असतानाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर नेमकं कोण उतरणार यावर अजूनही चर्चा सुरू आहे.
भारताच्या अंतिम संघामध्ये अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळावी, असं अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि समीक्षकाचं मत आहे. तर, दुसरीकडे, अश्विनसारख्या गोलंदाजाला खेळपट्टीच्या मदतीची गरज नसते. अश्विन कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजांवर भेदक मारा करू शकतो, असंही काहींचं मत आहे.
इंग्लंडच्या खेळपट्टीवरही अश्विनचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने ७ कसोटीत १८ विकेट्स घेतल्या असून २६१ धावादेखील केल्या आहेत. नाबाद ४८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियन संघातील चार प्रमुख फलंदाज डावखुरे आहेत आणि यांच्यासमोर अश्विन सर्वोत्तम पर्याय आहे. सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजांचा विचार करता अश्विनविरुद्ध फक्त ट्रॅव्हिस हेडची सरासरी २५ पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत अश्विन भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अश्विनचा भीमपराक्रम
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविरोधात अश्विनची आकडेवारी पाहता, त्याचं पारड जड दिसून येत आहे. अश्विनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड दमदार आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सामने खेळले असून यात तब्बल ११४ कांगारूंची शिकार केली आहे. त्याचबरोबर फलंदाजीतही उपयोगी योगदान देताना अश्विनने ५४३ धावा केल्या आहेत. यामध्ये ६२ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात वेळा पाच किंवा त्यापेक्षा बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघात समाविष्ट असलेल्या फलंदाजांविरुद्ध अश्विननं विक्रमी कामगिरी केली आहे. अश्विनने स्टीव्ह स्मिथला ८ वेळा बाद केले आहे. डेव्हिड वॉर्नर हा तर अश्विनचा ‘बकरा’ ठरला आहे. अश्विने त्याला तब्बल ११ वेळा बाद केले असून या दरम्यान वाॅर्नरला फक्त १९४ धावा करता आल्या. उस्मान ख्वाजालादेखील अश्विनने चार वेळा बाद केलं आहे. तर, अॅलेक्स केरीला फक्त २५ धावांच्या मोबदल्यात पाच वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.
वृत्तसंस्था