मैदानात संधी नसल्याने 'तो' बनला आमदार
#कोलकाता
भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांचे करिअर मैदानात फार काळ टिकू शकलेले नाही. एका माजी वेगवान गोलंदाजाबाबतही हेच घडले आहे. अशोक डिंडाने भारतासाठी केवळ २२ सामने खळले. नंतर क्रिकेटमधून संन्यास घेत डिंडाने राजकारणात प्रवेश केला. पश्चिम बंगालमधील मोयना विधानसभा मतदारसंघातून तो आमदारही बनला.
भारतीय संघातील अनेक खेळाडूंचे क्रिकेटमधील करिअर फार काळ चालू शकलेले नाही. काहींना मैदानाबाहेरचा मार्ग स्वीकारावा लागला तर काहींनी कामगिरी सुधारत संधीची वाट पाहिली आहे. कोलकात्याच्या एका लहानशा गावात 'मोयना' येथे राहणाऱ्या अशोकने २००४-०५ मध्ये सराव शिबिरात भाग घेतला. तिथे खेळताना तिथल्या प्रशिक्षकांना त्याची गोलंदाजी आवडली. त्यानंतर पुढे रणजीमध्ये त्याला संधी देण्यात आली. नंतर पुढे अशोकला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळाली. अशोक डिंडाने भारतीय संघासाठी केवळ २२ सामने खेळले आहेत. अशोक डिंडाने टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण केले. श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळताना त्याला तीन षटक टाकण्याची संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने १ विकेट घेत ३४ धावा दिल्या होत्या. मात्र २०१३ नंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०२१ मध्ये त्याने क्रिकेटमधून संन्यास घेतला. क्रिकेटमध्ये संधी न मिळाल्यामुळे अशोकने निराश न होता राजकीय जीवनात प्रवेश केला. २०२१ मध्ये अशोक डिंडाला मोयना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. भाजपच्या तिकिटावर अशोक या मतदारसंघातून विजयी झाला आणि आता आमदार म्हणून काम करत आहे.