‘एनसीए’च्या शिबिरासाठी अर्जुन तेंडुलकरची निवड
#मुंबई
तिकडे लंडनमध्ये भारतीय संघ कसोटीतील जगज्जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियासोबत झुंजत असताना इकडे बीसीसीआय भविष्यातील संघ डोळ्यासमोर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूंना आकार देण्याचे काम करीत आहे. याचाच एक भाग म्हणून बीसीसीआयचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ‘हाय परफाॅर्मन्स कॅम्प’मध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड केली आहे.
आयपीएलचा १६ वा मोसम काही दिवसांपूर्वी संपला. यामध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा सिद्ध करून जबरदस्त कामगिरी केली. यात अर्जुनचाही समावेश आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जुनने यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.
सध्या लंडन येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जात आहे. यासाठी टीम इंडियात अनेक अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंचादेखील समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच भविष्यातील संघासाठी खेळाडू घडवण्यासाठी बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हाय परफाॅर्मन्स शिबिराचे आयोजन केले आहे.
अष्टपैलू अर्जुन यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करत मुंबई इंडियन्सकडून ४ सामने खेळला. यात त्याने ३ बळी घेतले असले तरी त्याच्या गोलंदाजीचे अनेकांनी कौतुक केले. तसेच अर्जुनने यापूर्वी रणजी क्रिकेटमध्ये गोव्याकडून पदार्पण करत असतानादेखील उत्तम कामगिरी केली होती.
अर्जुनने आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शिबिरात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने हाय परफार्मन्स शिबिरात भाग घेण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीने उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याची निवड केली आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीचे हे शिबिर बंगळुरूमध्ये १९ दिवस चालणार आहे. १७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत हे शिबिर होत आहे. वृत्तसंस्था