Maharashtra | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर..! शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर 'या' ८९ खेळाडूंचा होणार सन्मान...

माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते (आर्चरी) आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 16 Apr 2025
  • 03:45 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News, Sports,

२०२३-२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा

-शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव 

-  पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना थेट पुरस्कार...

मुंबई : सन २०२३-२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी( दि. १५) मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते (आर्चरी) आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना  शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरविले जाणार आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

पुण्यात शुक्रवार १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता  म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,  विधान सभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सन २२०२२-२३ व २०२३-२४ अशा दोन वर्षांच्या पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे. मुंबईत मंगळवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह  उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार,  खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  असे एकूण ८९ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. १८ खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जीवन गौरवसाठी पाच लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी तीन लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.

पुरस्काराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर पुरस्काराच्या मानकरी...

२००१ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. १९७९  ते १९८२ कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा  विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल आठ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जून पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

२०२३-२४ पुरस्कार्थींची यादी....

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार – शकुंतला खटावकर (पुणे). 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक : जिम्नॅस्टिक्स - प्रवीण ढगे (पुणे). कुस्ती - गोविंद पवार (पुणे), शिवशंकर भावले (लातूर). खो-खो - प्रवीण बागल (धाराशिव).

दिव्यांग मार्गदर्शक – मानसिंग पाटील (कोल्हापूर, पॅरा जलतरण). थेट पुरस्कार – गणेश देवरुखकर (मुंबई उपनगर). जिजामाता पुरस्कार – रचना धोपेश्वर (पुणे, पॅरा ज्युदो).

खेळाडू (थेट पुरस्कार) –

तिरंदाजी – अदिती स्वामी (सातारा), ओजस देवतळे (नागपूर), प्रथमेश जवकार (बुलढाणा), ॲथलेटिक्स – ऐश्वर्या मिश्रा (मुंबई उपनगर). बॅडमिंटन – चिराग शेट्टी (मुंबई उपनगर).

क्रिकेट – जेमिमा रॉड्रिग्ज (मुंबई शहर), देविका वैद्य (पुणे), राहुल त्रिपाठी (पुणे), ऋतुराज गायकवाड (पुणे), शिवम दुबे (मुंबई उपनगर), जितेश शर्मा (अमरावती), यशस्वी जयस्वाल (मुंबई शहर). अश्वारोहण – हृदय छेडा (मुंबई उपनगर).

हॉकी – वैष्णवी फाळके (सातारा).

कबड्डी – अस्लम इनामदार (अहिल्यानगर), आकाश शिंदे (नाशिक). रोइंग – धनंजय पांडे (रायगड). नेमबाजी – किरण जाधव (सातारा).

जलतरण वॉटरपोलो – सांजली वानखेडे (अमरावती), उदय उत्तेकर (ठाणे). तिरंदाजी – मंजिरी अलोणे (अमरावती), यशदीप भोगे (अमरावती). ॲथलेटिक्स – यमुना आत्माराम (पुणे), किरण भोसले (कोल्हापूर). बॅडमिंटन – अक्षया वारंग (मुंबई शहर). बॉक्सिंग – अजय पेंडोर (नांदेड). तलवारबाजी – श्रुती जोशी (नागपूर), धनंजय जाधव (सांगली). कॅनोइंग व कयाकिंग – अंकुश पोवटे (सांगली).

सायकलिंग – ऋतिका गायकवाड (नाशिक), मयूर पवार (सातारा). जिम्नॅस्टिक्स (आर्टिस्टिक्स) – ईशिता रेवाळे (मुंबई उपनगर). रिदमिक जिम्नॅस्टिक्स – संयुक्ता काळे (ठाणे). जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन – राही पाखले (ठाणे), आदर्श भोईर (ठाणे). ज्युदो – श्रद्धा चोपडे (छत्रपती संभाजीनगर).

रग्बी – कल्याणी पाटील (कोल्हापूर), पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर). रोइंग – मृण्मयी साळगावकर (नाशिक), विपूल घुरडे (अमरावती). स्पोर्ट्स क्लायम्बिंग – सानिया शेख (पुणे). स्क्वॉश – राहुल बैठा (ठाणे). टेबल टेनिस – स्वस्तिका घोष (ठाणे). ट्रायथलॉन – मानसी मोहिते (रायगड). वेटलिफ्टिंग – दिपाली गुरसाळे (सांगली), अभिषेक निपाणी (कोल्हापूर). कुस्ती – सृष्टी भोसले (कोल्हापूर), तुषार डुबे (पुणे), स्केटिंग – स्नेहा तायशेटे (मुंबई), जिनेश नानल (पुणे). वुशू – तृप्ती चांदवडकर (पुणे), ऋषिकेश मालोरे (रायगड). सॉफ्टबॉल – ऐश्वर्या पुरी (कोल्हापूर), प्रितीश पाटील (जळगाव).

बेसबॉल – रेखा धनगर (जळगाव), प्रदीप पाटील (मुंबई शहर). कबड्डी – पूजा यादव (मुंबई शहर), शंकर गदाई (अहिल्यानगर). खो-खो – गौरी शिंदे (धाराशिव), ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर). मल्लखांब – शुभंकर खवले (मुंबई उपनगर). आट्यापाट्या – शिल्पा डोंगरे (धाराशिव). योगासन – छकुली सेलोकर (नागपूर), वैभव श्रीरामे (नागपूर). कॅरम – आकांक्षा कदम (रत्नागिरी), योगेश धोंगडे (नागपूर).

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार : जमीन – कृष्णा ढोकले (पुणे), जल – तन्वी देवरे-चव्हाण (नाशिक).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) : ॲथलेटिक्स - मंगला अडम्बर (नागपूर). पॅरा ॲथलेटिक्स – सचिन खिलारी (सांगली, थेट पुरस्कार), दिलीप गावित (नाशिक, थेट पुरस्कार), संगमेश्वर बिराजदार (धाराशिव). बुद्धिबळ (अंध) – संस्कृती मोरे (सातारा-थेट पुरस्कार), आर्यन जोशी (ठाणे, थेट पुरस्कार). पॅरा ज्युदो – साक्षी बनसोडे (पुणे, थेट पुरस्कार), वैष्णवी मोरे (पुणे, थेट पुरस्कार). पॅरा-नेमबाजी – संतोष गाढे (पुणे, थेट पुरस्कार). पॅरा सायकलिंग – ज्योती गडेरिया (भंडारा). बॅडमिंटन – प्रेमकुमार आळे (पुणे).

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०१९-२०) – जलतरण-डायव्हिंग – आदित्य गिराम. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०२१-२२) – जिम्नॅस्टिक (आर्टिस्टिक्स) – वैदेही देऊळकर.

Share this story

Latest