आयपीएलपेक्षा कायम देशासाठी खेळायला प्राधान्य : मिशेल स्टार्क
#लंडन
आयपीएल महत्त्वाची की देशाचे सामने, याबाबत आपल्या देशातील खेळाडूंमध्ये मतमतांतरे असली तरी ऑस्ट्रेलियाचा भन्नाट वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने ‘‘पैसा येईल आणि जाईल. मात्र मी आयपीएलपेक्षा कायम देशासाठी खेळायला प्राधान्य दिले आणि यापुढेही देईल,’’ असे नमूद करीत आपली प्राथमिकता स्पष्ट केली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल २०९ धावांनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर संघातील मुख्य खेळाडूंवर टीका होताना दिसत आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू या महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरले. हाच धागा पकडत खेळाडूंसाठी आयपीएल महत्त्वाची की देशाचे सामने असा सवाल चाहत्यांनी केला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्कने या संदर्भात केलेल्या वक्तव्याने भारतीय खेळाडूंवरील रोष आणखी वाढला आहे.
‘‘मी आयपीएलचा आनंद लुटला. यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेटही खेळलो, पण ऑस्ट्रेलियासाठी खेळणे हे माझं पहिलं प्राधान्य होतं आणि आहे. पैसा येईल आणि जाईल पण आयपीएलपेक्षा कायम देशासाठी खेळायला माझे प्राधान्य असेल. मला पुन्हा आयपीएल खेळायला आवडेल पण ऑस्ट्रेलियासाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये चांगले योगदान देणे याला माझी प्राथमिकता असेल,’’ असे स्टार्कने म्हटले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्टार्कने दोन्ही डावात प्रत्येकी २ बळी घेतले.
स्टार्कचे अनेक सहकारी खेळाडू आयपीएल, बिग बॅशसह जगातील आघाडीच्या टी-२० लीगमध्ये खेळत आहेत, पण स्टार्क या मोहापासून दूर राहिला. देशासाठी खेळणं याला खेळाडूंनी प्राधान्य द्यायला हवं आणि युवा क्रिकेटपटूंनीसुद्धा असाच विचार करण्याची गरज असल्याचं स्टार्क म्हणाला.
वृत्तसंस्था