अजिंक्य पुनरागमनासाठी सज्ज
# लंडन
टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे सुमारे १९ महिन्यांनंतर कसोटीमध्ये पुनरागमन करत आहे. ७ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात त्याचा समावेश आहे. भूतकाळाचा विचार करत नसल्याचे तसेच आयपीएल विशेष असून त्याप्रमाणेच कसोटीतही खेळणार असल्याचे सांगत तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
अजिंक्यने जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती आणि नंतर खराब फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आले होते. टीम इंडिया ७ जून रोजी इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम लढत खेळणार आहे.
आयपीएल २०२३ मध्ये अजिंक्यची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने अनेक सामन्यांमध्ये काही शानदार खेळी खेळल्या. कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या रहाणेला त्याच्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य म्हणाला, ‘‘मी १८-१९ महिन्यांनंतर पुनरागमन केले आहे. जे काही घडले ते चांगले किंवा वाईट, मला माझ्या भूतकाळाचा विचार करायचा नाही. मला नव्याने सुरुवात करायची आहे आणि आयपीएलप्रमाणेच फलंदाजी सुरू ठेवायची आहे.’’
‘‘मी वैयक्तिकरित्या चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळण्याचा आनंद घेतला. संपूर्ण हंगामात चांगली फलंदाजी करण्यात यशस्वी ठरलो, याचे मला समाधान आहे. आयपीएलपूर्वी देशांतर्गत हंगामातही मी चांगली कामगिरी केली आणि मला चांगले वाटत आहे. त्यामुळेच हे पुनरागमन माझ्यासाठी थोडे खास होते,’’ अशी प्रतिक्रियादेखील अजिंक्यने व्यक्त केली.
अजिंक्यने आयपीएलमधील १४ सामन्यांमध्ये ३२६ धावा केल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७२.४९ असा भन्नाट होता. अंतिम सामन्यातही त्याने आक्रमक फलंदाजी करीत चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. मागील वर्षी दुलीप ट्रॉफीसह सप्टेंबर २०२२ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजिंक्य मैदानावर परतला. त्याने पश्चिम विभागासाठी नाबाद २०७ धावांची सुरेख खेळी केली. रणजी स्पर्धेत अजिंक्यने हैदराबादविरुद्ध द्विशतक आणि आसामविरुद्ध १९१ धावांची मोठी खेळी केली. मागील वर्षी रणजीत त्याने एकूण ६३४ धावा केल्या होत्या.
३४ वर्षीय अजिंक्य रहाणेने भारतासाठी आतापर्यंत ८२ कसोटीत ४,९३१ धावा केल्या आहेत. ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर २९६२ धावांची नोंद आहे. २० टी-२० सामन्यांमध्ये अजिंक्यने ३७५ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत १२ तर एकदिवसीय प्रकारात ३ शतके झळकावली आहेत.
वृत्तसंस्था