कसोटी जगज्जेतेपदानंतर आता ॲशेस!
#लंडन
ऑस्ट्रेलियाचा संघ आता कसोटीतही जगज्जेता ठरला आहे. बर्याच संघांसाठी चॅम्पियन बनणे हा अंतिम टप्पा असेल, परंतु ऑस्ट्रेलियासाठी नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेची अंतिम लढत जिंकणे हा कांगारूंसाठी दीर्घ इंग्लिश मोसमचा अतिशय सकारात्मक प्रारंभ ठरला आहे. आता यानंतर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या परांपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये ॲशेस मालिकेचे द्वंद्व रंगणार आहे.
तब्बल ४६ दिवस चालणाऱ्या या लढाईत पाच कसोटी सामने होणार आहेत. येत्या शुक्रवारपासून
(दि. १६) बर्मिंगहॅम येथे उभय संघांत पहिली कसोटी सुरू होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम लढतीसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडे अनेक प्रश्न होते. यातील काहींची उत्तरे त्याला अंतिम फेरीतून मिळाली.
फायनलचा शतकवीर ट्रॅव्हिस हेड मागच्या वेळेप्रमाणे धावा काढण्यासाठी सज्ज दिसत आहे. स्कॉट बोलंडच्या रूपाने संघाला तिसरा वेगवान गोलंदाज मिळाला. दुसरीकडे इंग्लंडने बाझबॉल तंत्राने चांगली तयारी केली आहे. याच बाझबॉलने इंग्लंडला शेवटच्या १२ पैकी १० कसोटी जिंकण्यास मदत केली. मॅक्युलम प्रशिक्षक आणि स्टोक्स कर्णधार झाल्यानंतर इंग्लंडने ते स्वीकारले आणि त्यांचा खेळ पूर्णपणे बदलला. सलग चौथ्यांदा अॅशेस राखण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या प्रयत्नात बाझबॉल हा मोठा अडथळा ठरू शकतो. असे असले तरी, यजमान इंग्लंडच्या या नव्या व्युहरचनेला तोडीस तोड उत्तर देण्याच्या इराद्याच्या कांगारू या मालिकेत उतरणार आहेत.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला गोलंदाजीत प्रभावी पर्याय मिळाला आहे. हेझलवूड अनफिट असल्याचा फायदा स्काॅट बोलंॅडला मिळाला. फायनलमध्ये त्याने कोहली आणि जडेजाला तीन चेंडूत बाद करून सामन्याचा रंग बदलला. हेझलवूड तंदुरुस्त झाल्यानंतर, कर्णधार कमिन्सला तिसरा गोलंदाज म्हणून बोलंॅड आणि हेझलवूड यांच्यातील एकाची निवड करण्याचे आव्हान असेल. त्याचबरोबर मालिकेत एखादा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यास बोलंॅड दिमतीला असल्याने कमिन्सला त्याची चिंता नसेल.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीतील चिंतेचा विचार करता फायनलमध्ये स्टार्कच्या गोलंदाजीत लय नव्हती. त्याच वेळी, कर्णधार कमिन्स दिशाहीन ठरला. त्याने तब्बल ९ नो बॉल टाकले. फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या अजिंक्य रहाणेला कमिन्सच्या नो बॉलमुळे जीवदान मिळाले होते.
यापूर्वी झालेल्या अॅशेस मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या हेडने डब्लयूटीसीमधील सर्वात मोठी खेळी केली. २०२१ च्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा हेड सर्वाधिक धावा करणारा होता. त्याने अंतिम सामन्यात १६३ धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. अॅशेसपूर्वी फॉर्मात आल्याने त्याला खूप आत्मविश्वास मिळाला.
२०२१ च्या ॲशेसमध्ये स्मिथ केवळ ३० च्या सरासरीने २४४ धावा करू शकला होता.२०१९च्या ॲशेस मालिकेत ७००हून अधिक धावांचा पाऊस पाडणाऱ्या स्मिथला यावेळी इंग्लंडमध्ये धावा करता येतील का, याबाबत उत्सुकता आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या डावात शतक झळकावून त्याने याचे उकारात्मक उत्तर दिले.
बाझबॉल तंत्राने इंग्लंडचा स्कोअरिंग रेट वाढला
इंग्लंडने गेल्या वर्षी बाझबॉलचे तंत्र अवलंबले. त्यामुळे २०२२ मध्ये कसोटीत इंग्लंडचा रनरेट ४.१३ होता, जो कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे. फलंदाजीसोबतच गोलंदाजांनाही फायदा झाला. इंग्लंडने १३ पैकी १२ कसोटीत प्रतिस्पर्ध्याच्या सर्व २० विकेट घेतल्या होत्या. ही आकडेवारी पाहता, ऑस्ट्रेलियासमोर बाझबॉलचे मोठे आव्हान असेल. डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत भारतीय गोलंदाजांनी हेडला अस्वस्थ करून सोडले होते. सिराजच्या बाऊन्सरसमोर तो अनेकदा गोंधळला. पहिल्या डावात तो बाउन्सरवर बाद झाला. थोडक्यात, भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला हेडचा काटा काढण्याची युक्ती दाखवली आहे.
अँडरसनवर असेल लक्ष
पुढील महिन्यात ४१ वर्षांचा होणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन २० वर्षांपासून त्याच दिनक्रमाची पुनरावृत्ती करत आहे. तो १८ मीटर अंतरावरून धावतो आणि १६ किमीच्या वेगाने बॉलिंग क्रीजवर पोहोचतो. तो क्रीजच्या थोडासा आधी उडी मारतो, त्याचे वरचे शरीर उजव्या हाताकडे वळवतो आणि नंतर १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो. सध्या तो कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे. अँडरसनच्या नावे सध्या ६८५ बळी आहेत. विशेष म्हणजे, अँडरसन वयाच्या ३० वर्षानंतर अधिक धोकादायक बनला. ३० वर्षांचा झाल्यानंतर त्याने २३.१७ च्या सरासरीने ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या चार गोलंदाजांच्या यादीत अँडरसन हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.
वृत्तसंस्था