द्रविडनंतर प्रशिक्षकपदासाठी पाच दिग्गजांच्या नावांची चर्चा
#नवी दिल्ली
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्यांदा टी-२० विश्वचषक आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे प्रशिक्षक बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याच्याऐवजी आशिष नेहरा, जस्टीन लॅंगर, स्टीफन फ्लेमिंग, गौतम गंभीर, रिकी पाॅंटिंग या दिग्गजांची नावे भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहेत.
रवी शास्त्री यांनी २०२१ टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक पद सोडल्यानंतर राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. द्रविडच्या निवडीमुळे टीम इंडियाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपेल,अशी आशा होती. पण तसं झालं नाही. पण असं असलं तरी एकदिवसीय विश्वचषक संपेपर्यंत द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवले जाण्याची शक्यता नाही. टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यास द्रविड त्यानंतरही प्रशिक्षकपदी कायम राहू शकतो. पण टीम इंडिया या स्पर्धेत पराभूत झाल्यास द्रविडची गच्छंती निश्चित मानली जात आहे.
टीम इंडियामध्ये राहुल द्रविडची जागा भरू शकणार्यांमध्ये आशिष नेहराचे नाव पुढे येऊ शकते. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा सध्या आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली गुजरात संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनल खेळला. त्यापैकी एक जिंकला तर दुसरा हरला. आयपीएलमध्ये एका संघाला मोठे करणारा नेहरा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा प्रमुख दावेदार आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला २०२१ मध्ये टी-२०त विश्वविजेता ठरला. त्यापाठोपाठ २०२१-२२च्या ॲशेस मालिकेत कांगारूंनी इंग्लंडला पाणी पाजले. या दोन्ही मालिकांत ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवण्यासाठी यापूर्वी कठोर परिश्रम घेणारा प्रशिक्षक जस्टिन लँगरदेखील या पदासाठी प्रबळ दावेदार आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर स्टीफन फ्लेमिंग सध्या एक दशकाहून अधिक काळ आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव प्रशिक्षक आहे. त्यामुळे टीम इंडियाचा प्रशिक्षकही होऊ शकतो
जागतिक क्रिकेटमध्ये महान सलामीवीरांपैकी एक नाव म्हणजे गौतम गंभीर.आयपीएलमधील लखनौ सुपरजायंट्सचा तो मार्गदर्शक आहे. मात्र गंभीरला इतरांप्रमाणे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव नाही. पण टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर सक्षम आहे.
सर्वाधिक आयसीसी पुरस्कार जिंकण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. तसेच आयपीएलमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने मुंबई इंडियन्स संघाला चॅम्पियन बनवले आहे. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. पाँटिंग दिल्ली संघातून बाहेर पडण्याची शक्यता असून, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी पाँटिंगही योग्य पर्याय ठरू शकतो.
वृत्तसंस्था